शिवसेना संपर्क प्रमुखांच्या दौऱ्याला क्षीरसागरांकडून बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:06+5:302021-08-29T04:32:06+5:30
सोमनाथ खताळ बीड : राज्याचे राेहयो व फलोत्पादन मंत्री तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संदीपान भुमरे हे शनिवारी जिल्हा ...
सोमनाथ खताळ
बीड : राज्याचे राेहयो व फलोत्पादन मंत्री तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संदीपान भुमरे हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. परंतु यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे कोठेही दिसले नाहीत. त्यांना दौऱ्याची माहिती नव्हती, निमंत्रण नव्हते की, मुद्दाम येणे टाळले? तसेच येणाऱ्या काळात पालिका निवडणुका असतानाही त्यांची गैरहजेरी असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
येत्या काही महिन्यात नगर पालिका व नगर पंचायत निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा मंत्री संदीपान भुमरे शनिवारी दिवसभर जिल्ह्यात होते. अगोदर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या खात्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संपूर्ण दौऱ्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व त्यांचे बंधू तथा बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर काेठेही दिसले नाहीत. तसेच नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागरही या दौऱ्यात समोर आले नाहीत. या सर्व प्रकारावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. क्षीरसागरांनी या दौऱ्याला येणे का टाळले? की, मुद्दाम या दिवशी बाहेर गेले, याबाबत विश्रामगृहावर चर्चा सुरू होती. पालिका निवडणूक व मान, सन्मानावरून अंतर्गत गटबाजी तर, नाही ना, असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
---
संदीप क्षीरसागर मंत्र्यांच्या सोबतच
बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे मात्र, संदीपान भुमरे यांच्या सोबतच होते. बैठक आटोपल्यानंतरही ते विश्रामगृहावर सोबत आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह निघून गेले. संदीप क्षीरसागर हे युतीचे मंत्री असल्याने प्रोटोकॉल म्हणून सोबत होते की, काका नसल्याने मुद्दाम हजेरी लावली? याबाबतही चर्चा होती.
---
नगराध्यक्ष म्हणाले, बीडला नाहीत...
ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांना संपर्क केला तर, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आपण बीडमध्ये नाहीत. त्यामुळे उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक योगेश क्षीरसागर यांचा फोन लागला नाही.
280821\28bed_16_28082021_14.jpg~280821\28bed_18_28082021_14.jpg
डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष बीड~जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री