शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढला
By सोमनाथ खताळ | Published: July 2, 2024 09:53 PM2024-07-02T21:53:23+5:302024-07-02T21:53:33+5:30
यावेळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.
बीड: आपल्याच पक्षातील उपजिल्हाप्रमुखावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवस वाढला आहे.
या आगोदरही त्यांना तीन दिवसांची कोठडी मिळाली होती. ती संपल्याने त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना ३ एप्रिल रोजी गावाकडे जाताना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
यात खांडे यांना मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केल असता आणखी तीन दिवस वाढीव कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, खांडे यांना न्यायालयात नेताना समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.