शिवसैनिकांनो, ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे ताकद दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:09 AM2019-10-05T00:09:57+5:302019-10-05T00:10:32+5:30
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीत डोळ्यात तेल घालून रात्र रात्र जागुन काढता. मतदार याद्यातून एक एक मतदार शोधण्यासाठी दारोदार जाता, ...
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीत डोळ्यात तेल घालून रात्र रात्र जागुन काढता. मतदार याद्यातून एक एक मतदार शोधण्यासाठी दारोदार जाता, गावात किती बाहेर, किती याचा शोध घेता आणि प्रचंड ताकद पणाला लावून ग्रामपंचायत पदरात पाडून घेता. तीच ताकद, शक्ती रात्रीचा दिवस करून जयदत्तआण्णांच्या पाठीशी उभी करा. बीडवर भगवा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले.
विधानसभेचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्तआण्णा क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुरूवारी पारसनगरी, माने कॉम्पलेक्स परिसरात झालेल्या जाहीर सभेत कुंडलिक खांडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूंक, नगराध्यक्ष डॉ.भारतीभूषण क्षीरसागर, नितिन धांडे, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, बाळासाहेब पिंगळे, अनिल जगताप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना कुंडलिक खांडे म्हणाले की व्हॉट्सअॅप, फेसबूक यावरून हा फुटला तो फुटला, अशा वावड्या उठतील. अनेकांचे मनभेद करण्याचा प्रयत्न करतील. पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आण्णांची ताकत आणि शिवसेनेची शक्ती एकत्र झाली तर जयदत्तआण्णा महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
योगेश क्षीरसागर : धनुष्यबाणावर मतदान करा
पिंगळे गल्ली, धांडे गल्ली, माळी गल्ली इथल्या बहाद्दर शिवसैनिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आतापर्यंत शिवसेनेला मतदान केले. २१ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेला भरभरून मतदान करण्याची परंपरा कायम ठेवा, असे आवाहन शिवसेनेचे युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
बीड विधानसभेचे शिवसेना, भाजपा, रासप, रिपाई व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार जयदत्तआण्णा क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ माळी गल्ली येथील कॉर्नर बैठकीत डॉ.योगेश क्षीरसागर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवानेते विनोद धांडे, अॅड.महेश धांडे, फय्याज कुरेशी, भारत मनेरी, अॅड.नागेश तांबारे, सतिश दुधाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली सर्व गट, तट एकत्र झाले आहेत. त्यामुळे बीड मतदार संघात शिवसेनेची ताकत खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण आण्णांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकत्र आलात आणि जो विश्वास दाखवला, त्याला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करूत. या भागात शिवसेनेची पहिली शाखा सन १९८६ साली स्थापन झाली होती. तोच शिवसेनेचा बाणा आजही कायम राहिला आहे. त्याचा विस्तार आणि वाढ करण्याची जबाबदारी आपलीच राहील. जे शिवसेनेशी कायम बांधून राहिले, त्या शिवसैनिकांना योग्य तो न्याय दिला जाईल, असे ही ते यावेळी ते म्हणाले.
प्रास्ताविक अॅड.महेश धांडे यांनी केले. या व्यापक बैठकीसाठी परिसरातील शिवसैनिक, युवक, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.