शिवप्रेमींची गर्दी, डोळ्यांचे पारणे फिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:58 PM2020-02-19T23:58:36+5:302020-02-19T23:59:09+5:30
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली.
बीड : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली. बीड येथे सकाळी सर्वधर्मिय अभिवादन रॅली काढण्यात आली, तर दुपारी निघालेल्या सार्वजनिक उत्सव समितीच्या मिरवणुकीने यंदाही अलोट गर्दीचा उच्चांक मोडला. कलाकारांच्या सादरीकरणाने बीडकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची मिरवणूक शिवप्रेमींचे आकर्षण होती. देशाच्या विविध राज्यातून आलेल्या पथकांनी कला आणि चित्तथरारक खेळांनी भारतीय मर्दानी खेळांचे प्रदर्शन घडवित शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवप्रेमींना अनोखी मेजवानी दिली. तर महाराष्टÑाच्या विविध भागांतून आलेल्या ढोल पथकांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहताना जणू शिवसृष्टी अवतरल्याचे दिसून आले.
सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात शासकीय शिवपूजन झाले. शहर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय जाधव यांनी पुतळ्यास माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, सीईओ अजित कुंभार, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह राजकीय, सामाजिक व प्रशासनातील नागरिक, शिवप्रेमी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस विभागाच्या बॅन्ड पथकाने मानवंदना दिली. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मुख्य मिरवणूकीला प्रारंभ झाला. मिरवणूकीत सहभागी होत शिवप्रेमींनी कलाप्रकारांचा आनंद लुटला.
विशेष शो...महिलांची तोबा गर्दी
सार्वजनिक उत्सव सोहळ्यात बीडमध्ये महिलांसाठी कलापथकांचा विशेष शो सिध्दीविनायक कॉम्पलेक्सच्या मोकळया जागेत झाला. आ. संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनातून मागील काही वर्षांपासून होत असलेल्या शिवजयंती सोहळ्यात महिलांचा सहभाग वाढला आहे. मुख्य मिरवणुकीत सुभाष रोडवर गॅलरी तयार करून महिलांसाठी विशेष कार्यक्रम होत होते. यंदा मात्र विस्तृत जागेत शिस्तीत विशेष सादरीकरण झाले. या ठिकाणी केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात आला. पूर्ण परिसर महिलांच्या गर्दीने फुलला होता.
आर्मी बॅगपाईपर कलाप्रकार
भारतीय लष्कर व पंजाब पोलीस दलापुरतेच मर्यादित असलेला हा कलाप्रकार लुधियाना येथील सिव्हीलियन तरूणांनी हासदा पंजाब पाईप बॅँड नावाने कलाप्रेमींसाठी साकारला आहे. कोणी दहावी तर कोणी पदवीधर यात आहेत. तीन देश आणि १८ राज्यात सादरीकरण या पथकाने कलेले आहे. ८ बॅगपाईप, १ बेस ढोल मोठा, २ बेस ढोल लहान, ३ तंदी (लहान ढोल), १ स्टीक मास्टर यात आहेत. वाघा बॉर्डर अथवा इतरत्र सैन्य दलातील जवानांप्रमाणे या कलेचे सादरीकरण देखणे होते.