परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:56 PM2024-08-20T16:56:58+5:302024-08-20T16:57:44+5:30

कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह अनेक उपक्रम

Shivrajsinha Chauhan, Eknath Shinde will come to Parali for state level agriculture festival | परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

परळी (बीड) : राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे परळी येथे २१ ऑगस्ट (बुधवार) पासून २५ ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय महोत्सवाचे उद्या बुधवारी (ता.२१) दुपारी १ वाजता दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

परळी वैद्यनाथ नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील व बीड जिल्ह्यातील मान्यवर आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे.  २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता  येथील नाथ रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन  होणार असून, कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांसह शेतकरी बांधवांना अनेक प्रकारचे लाभदायक मार्गदर्शन मिळणार आहेत. महोत्सव शेतकऱ्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे  तरी राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

महोत्सवात विविध दालने, उपक्रमांची रेलचेल
या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, सेंद्रिय व नैसर्गिक शेती यांची दालने, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्री, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली असून भव्य वॉटरप्रूफ सभामंडप, चर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंग, भोजन आदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: Shivrajsinha Chauhan, Eknath Shinde will come to Parali for state level agriculture festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.