माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 05:53 PM2017-11-20T17:53:11+5:302017-11-20T18:01:26+5:30
उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले.
माजलगांव ( बीड): उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले.
बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात तीन साखर कारखाने आहेत. यावर्षी पवारवाडी येथील जय महेश, तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके व सावरगावच्या छत्रपती अशा तिन्ही कारखान्यांनी दराबाबत संगनमत केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत. सध्या राज्यात सर्वत्र उस दरावरून आंदोलन सुरु आहे. शिवसेनेनेही उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत उस दराबाबत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार तिन्ही साखर कारखान्यानी पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी, उस दर जाहीर करण्यात यावा, कार्यक्षेत्रातील उसाचे आधी गाळप करावे, गाळपानंतर 15 दिवसांत पैसे द्यावेत, 265 जातीच्या उसाची नोंद घेण्यात यावी यासह विवीध उस प्रश्नावर डाॅ. उध्दव नाईकनवरे यांनी जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना निवेदन दिले. यावेळी डिगांबर सोळंके, अमोल एरंडे, लक्ष्मणराव सोळंके, पापा सोळंके, राजेश जाधव, अच्युतराव रिंगणे, राधाकृष्ण येवले, विकास झेटे, नामदेव सोजे, विक्रम सोळंके, अतुल उगले, युवराज राठोड, श्रीराम खळेकर, जयराम राउत, उत्तम झाटे, सचिन दळवी, उध्दव शेंडगे, तीर्थराज पांचाळ, दिनेश रिंगणे, मदन कदम, कैलास मस्के, नारायण शेंडगे, युवराज राठोड, धम्मानंद गावढे, संभाजी पाष्टे, अशोक नाईकनवरे यांचेसह शंभर ते दिडशे शिवसैनिक सहभागी झाले होते. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सेना स्टाईल आंदोलन करणार
शेतक-यांच्या उसाचा प्रश्न गंभिर बनला असतांना लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना व छत्रपती साखर कारखाना उसाला भाव देत नसल्याने उस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पश्चिम महाराष्ट्ाच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील उस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे, याकरीता भाव मिळेपर्यंत सेना स्टाईल आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे डाॅ. उध्दव नाईकनवरे यांनी इशारा दिला आहे.