बीडजवळ शिवशाही बसला अपघात, 6 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 11:32 AM2018-05-01T11:32:13+5:302018-05-01T11:32:13+5:30

लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई-केज रोडवरील होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले.

shivshahi bus accident near by beed | बीडजवळ शिवशाही बसला अपघात, 6 प्रवासी जखमी

बीडजवळ शिवशाही बसला अपघात, 6 प्रवासी जखमी

Next

केज(बीड) : लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई-केज रोडवरील होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (1 मे) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास झाला. राज्यात अलिशान शिवशाही बसला झालेला हा पहिलाच अपघात आहे. सध्या लोखंडी सावरगावपासून मांजरसुंबापर्यंत महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून लहान-मोठ्या अपघातांचे सत्र सातत्याने सुरू आहे. मंगळवारी पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस (एमएच ०९ ईएम २४६८) होळच्या पुढे आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अरुंद रस्त्याच्या खाली उतरल्याने उलटली.

या अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय २६, रा. उंडेगाव), रेणुका कल्याण माळी (वय ३०, माळी चिंचोली) आणि अमर जियाउद्दीन सिद्दिकी (वय ९, लातूर) हे तिघे गंभीर जखमी झाले तर पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय ५६, केज), राजू सानुजी इवले (वय २६, औरंगाबाद) आणि सतीश गणपत गव्हाणे (वय ३०, बोरगाव) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बसमध्ये प्रवाशांची कमी संख्या आणि बसचा वेग नियंत्रणात असल्याने मोठी हानी झाली नाही. 

अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेत रुग्ण पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांना बोलावून घेऊन सर्व यंत्रणा तयार ठेवली होती. स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. कचरे यांनी स्वतः उपस्थित राहून जखमींच्या उपचारांवर लक्ष दिले.

होळ ग्रामस्थ मदतीला धावले,जेसीबीचा केला वापर 
अपघाताची माहिती मिळताच नेताजी शिंदे, विजय केंद्रे यांच्यासहित होळच्या अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. मात्र ढाकेफळ येथील शिक्षिका रेणुका माळी आणि लातूरचा अमर सिद्दिकी हे दोघेजण बसखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. अखेर नंदकिशोर मुंदडा यांनी होळ येथील संतोष शिंदे यांची जेसीबी मशीन अपघातस्थळी पाठविली. त्यानंतर ग्रामस्थांनी बसखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. केज आणि अंबाजोगाई येथील १०८ रुग्णवाहिकातील डॉक्टर आणि चालकांनी जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. अंबाजोगाई येथील गणेशभैय्या कदम युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.

Web Title: shivshahi bus accident near by beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.