बीडमध्ये शिवशाही बसचे चालक-वाहक प्रवाशांच्या मारहाणीत गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:58 PM2018-11-05T23:58:14+5:302018-11-06T00:00:08+5:30
प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे- बीड या शिवशाही बसचे वाहक ज्ञानेश्वर साळूंके, चालक हनुमान वाघमारे हे बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १००३) घेऊन रविवारी रात्री बीडकडे येत होते. अहमदनगर येथून एक प्रवासी या बसमध्ये चढला. वाहकाने प्रवाशांना तिकीट घेण्याचे सांगितले होते. असे असतानाही सदरील प्रवाशाने तिकीट घेण्यास टाळाटाळ केली. मद्य प्राशन केलेल्या या प्रवाशाने बऱ्याच वेळानंतर तिकीट मागितले. यावेळी वाहक सोळुंके आणि त्याच्यात बाचाबाची झाली. या प्रवाशाने वाहक आणि चालकाला बीडमध्ये पोहचल्यावर माणसे बोलावून मारण्याची धमकी दिली.
दरम्यान आष्टी येथे आल्यानंतर वाहतूक नियंत्रकांना याची माहिती देण्यात आली. यावेळी या प्रवाशाने आमचे मिटले असून, भांडण न करण्याचे अश्वासन दिले. रात्री १२ वाजेच्या दरम्यान शिवशाही बस बीड येथे पोहचली. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर वाहक-चालक बस जमा करून घरी निघाले असता, त्या प्रवाशाने बोलाविलेल्या आठ ते दहा जणांनी या दोघांवर हल्ला केला. यावेळी चालक व वाहकास काठ्याने मारहाण केली.
या मारहाणीत चालक व वाहक गंभीर जखमी झाले असून, चालक हनुमान वाघमारे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कामगार सेनेचे विभागीय सचिव राहुल बहिर, आगारप्रमुख पवार स्थानक प्रमुख महाजन व विविध संघटना पदाधिकारी यांनी जखमींची भेट घेतली. या प्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. नसता तीव्र आंदोलनाचा इशारा एस. टी. कर्मचाºयांनी दिला.