शिक्षण क्षेत्रात खळबळ; केजमधील मुख्याध्यापकाची बीड जिल्हा परिषदेसमोर आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:20 PM2022-12-06T19:20:28+5:302022-12-06T19:20:48+5:30
आधी केले विषारी द्रव्य प्राशन अन् नंतर घेतला गळफास
केज (बीड) : तालुक्यातील एका शाळेवरील मुख्याध्यापकांनी बीड येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. ५ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भारत सर्जेराव पाळवदे असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजत काही व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसला अन् एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. परंतु हा व्यक्ती कोण? असा प्रश्न पोलीस समोर होता. आज सकाळी मृताची ओळख पटली असून, भारत सर्जेराव पाळवदे ( ४५, रा. सासुरा, ता. केज ) असे मृताचे नाव आहे.
भारत पाळवदे हे केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील शाळेत मुख्याध्यापक असल्याची माहिती मिळाली. पाळवदे यांनी सुरुवातीला विषारी द्रव्ये प्राशन केले त्यानंतर माणसांची वर्दळ कमी झाल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या समोर एका हॉटेलच्या आडूला दोरीने गळफास घेतला. भारत यांनी आर्थिक विवंचना व मानसिक त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप कुटुंबाचा जबाब घेतला नसल्याने अधिक माहिती समोर आली नाही. या घटनेने जिल्हा परिषद व केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.