दुष्काळात महावितरणचा भारनियमनाचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:30 AM2019-03-17T00:30:07+5:302019-03-17T00:31:01+5:30
तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे.
गेवराई : तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचणी येत आहे.
तालुक्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाणीपातळी खोलवर गेलेली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पङल्या आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ‘अपडाऊन’मध्येच व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ कार्यालयीन कामाला देत येत नाहीत. इकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील शंभर गावांमध्ये जवळपास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भारनियमनामुळे रात्री-बेरात्री जागरण
तालुक्यात १०७ टँकरने विविध गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता नगर परिषद जलकुंभ मधून ६५ टँकर व अन्य १८ भागातील विहिरींमधून पाणी भरून आणतात. परंतु महावितरणकडून ८ तासांचे भारनियमन असल्याने रात्री-बेरात्री गावात टँकर येते. त्यामुळे रात्री टँकरची वाट पाहत जागरण करावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
पाणी शुध्दीकरणाकडे दुर्लक्ष
गावांना टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याच्या शुध्दीकरणाकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. याविषयी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाºयाने संगितले, ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुध्दीकरणाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायतकडे ब्लिचिंग पावडर आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले.
तालुक्यात टँकरग्रस्त गावे ८३ असून तालुक्यात १०७ टँकर सुरूअसून, यामध्ये शासकीय ५, खाजगी १०२ टँकर सुरूअसून मंजूर खेपा २११ आहेत.
भविष्यात तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार असून, शासकीय पातळीवर उपयोजना सुरू असल्याची गेवराई येथील पंचायत समिती येथील नूतन गटविकास अधिकारी एस.बी. मावळे यांनी सांगितले.