खळबळजनक! बीडमध्ये पोलीस निरीक्षकांचे घर फोडून सव्वा लाख लंपास
By संजय तिपाले | Published: July 18, 2022 06:17 PM2022-07-18T18:17:41+5:302022-07-18T18:20:19+5:30
घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज तोडून तीन चोरट्यांनी १६ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
- संजय तिपाले
बीड : घर बंद करून गावी गेलेल्या पोलीस निरीक्षकांच्या घरात शिरून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ जुलै रोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून, संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. ते बीडमध्ये जालना रोडवरील गंगाधाम परिसरात राहतात. माढा (जि. सोलापूर) हे त्यांचे मूळ गाव असून, १५ जुलै रोजी ते कुटुंबासह गावी गेले होते. १७ जुलै रोजी रात्री ८ वाजता ते बीडमध्ये परत आले. यावेळी घरातील साहित्य उचकटल्याचे आढळले. घरातून एक सोन्याची अंगठी, एक चांदीचा करंडा, चांदीचे ताट व रोख रक्कम असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज तोडून तीन चोरट्यांनी १६ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. याबाबत सुवर्णा महादेव राऊत यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.