धक्कादायक! बीडमध्ये ऑन ड्यूटी पोलिस हवालदाराच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By सोमनाथ खताळ | Published: February 27, 2024 11:27 AM2024-02-27T11:27:49+5:302024-02-27T11:29:00+5:30

त्रास जाणवत अस्वस्थ वाटत असल्याने स्वत: बुलेटवरून जिल्हा रुग्णालयात आले. डॉक्टरांसोबत बोलत असताना अचानक कोसळले

Shocking! An on-duty police constable died of a heart attack in Beed | धक्कादायक! बीडमध्ये ऑन ड्यूटी पोलिस हवालदाराच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

धक्कादायक! बीडमध्ये ऑन ड्यूटी पोलिस हवालदाराच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड : मराठा आरक्षणाचा बंदोबस्त असल्याने सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राखीव बंदोबस्त ठेवला होता. दुपारच्या वेळी सहकाऱ्यांसोबत चहा पिला. घरी गेल्यावर छातीत दुखत असल्याने स्वत: बुलेटवर जिल्हा रुग्णालयात आले. ओळखीच्या डॉक्टरांसोबत हसी मजाक करत असतानाच अचाकन हृदयविकाराचा झटका आल्याने कोसळले अन् क्षणात मृत्यू झाला. ही घटना बीड शहरात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

अन्वर अहमद शेख (वय ३६ रा.बीड) यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. सोमवारी मराठा आरक्षण आंदोलनाचा बंदोबस्त होता. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राखीव ठेवला होता. तरीही कार्यालयीन काम सुरू होते. असे असतानाच अन्वर यांना त्रास जाणवू लागला. परंतु, ॲसिडीटी असेल म्हणून दुर्लक्ष केले. नंतर थोडा थकवा जावा म्हणून ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत चहा पिण्यासाठी बाहेर आले. तेथून घरी गेले. परंतु घरी गेल्यावर अस्वस्थ वाटत असल्याने व त्रास जाणूव लागल्याने आपल्या भावाला सांगून स्वत: बुलेटवरून जिल्हा रुग्णालयात आले. येथे आल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली. ओळखीचे असल्याने आपल्या नेहमीच्या शैलीत हसी मजाक केला. याचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर काेसळले. डॉक्टरांनी उपचारासाठी प्रयत्न केले, परंतु काही क्षणात त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह बीड पाेलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मित्र परिवारांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात आईवडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू
अन्वर शेख हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता. सायबर पोलिस ठाण्यात सर्वच अधिकारी, कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे राहतात. काही तासांपूर्वीच आपल्यासोबत असलेले सहकारी अन्वर शेख यांच्या निधनाची अचानक बातमी कानावर धडकताच सायबर पोलिस ठाण्यातील सर्वांनाच धक्का बसला अन् त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अन्वर यांचा मृतदेह पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. इतरही मित्र परिवार आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते.

फुटबॉलमध्येही पदकांची कमाई
अन्वर शेख हे फुटबॉल खेळामध्ये उत्कृष्ट गोल किपर होते. उंच आणि शरीराने धष्टपुष्ट असणाऱ्या अन्वर यांनी खेळाच्या माध्यमातून बीड पोलिसांची मान उंचावलेली आहे. अन्वर यांच्या जाण्याने एक कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार आणि उत्कृष्ट खेळाडूही पोलिस दलाने गमावला आहे.

Web Title: Shocking! An on-duty police constable died of a heart attack in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.