धक्कादायक ! आष्टीत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 06:31 PM2020-04-21T18:31:38+5:302020-04-21T18:33:01+5:30
यानंतर महिलेस खाजगी वाहनाने बीड येथे नेण्यात आले
आष्टी : गर्भवती महिलेला पुढील उपचारासाठी बीड येथे नेण्यासाठी १०८ आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने येण्यास नकार दिला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील घरडघव्हाण येथील शिल्पा परशुराम येरकर (२३) या
गर्भवती महिला कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल होती. प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला बीड येथे जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नातेवाईकांनी मागणी केली. मात्र चालकाने रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने तुम्ही १०८ नंबरला फोन लावून त्यांना कल्पना द्या असे सांगत येण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेस खाजगी वाहनाने बीड येथे नेण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पीआय माधव सूर्यवंशी यांनी रुग्णालयाकडे लागलीच धाव घेतली. दरम्यान, जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.