धक्कादायक ! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या ; एक महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:58 AM2020-05-14T11:58:45+5:302020-05-14T11:59:18+5:30
याप्रकरणी पोलिसांनी १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
- दीपक नाईकवाडे
केज ( बीड ) : एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना मांगवडगाव (ता.केज) येथे बुधवारी रात्री (दि.१३) ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या वादातून १० ते १५ जणांनी हल्ला करून या हत्या केल्या असाव्यात. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी मृतांच्या तीन मोटार सायकलसह जीवनावश्यक वस्तूसुद्धा जाळण्यात आल्या आहेत. यातून हल्लेखोरांची निर्घृणता दिसून येते आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील मांगवडगाव येथील पवार कुटुंब हे शेतीच्या वादामुळे सन २००६ साला पासून अंबाजोगाई येथील यशवंत राव चौकात वास्तव्यास होते. साधारण दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पवार कुटुंबातील चार भाऊ व त्यांचे कुटुंब ट्रॅक्टर मधून मंगवडगाव येथे आले होते. पवार कुटुंब आल्याची माहिती मिळताच रात्री १० ते १५ जणांनी तलवार ,लोखंडी गज याने हल्ला केला. यात बाबू शंकर पवार वय ७० वर्ष , प्रकाश बाबू पवार वय 50 वर्ष , संजय बाबू पवार वय ४६ वर्ष या पिता पुत्रांची निर्घृण हत्या केली. तर दादुल्या प्रकाश पवार या महिलेस मारहाणीत गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे व केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. तर जखमी महिलेस अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. घटनास्थळी अंबाजोगाई ,केज ,युसुफ वडगाव पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी जवळपास एक किलो मीटरचा परिसर सिल केला असून पुढील तपास सुरू आहे.
१३ संशयितांना ताब्यात घेतले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी मध्यरात्री ३ च्या सुमारास भेट दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, १३ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस युसूफ वडगावचे सपोनि. आंनद झोटे यांनी दिली आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.