धक्कादायक ! कोरोनाबाधिताचा ‘व्हेंटिलेटर’विना तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 02:34 PM2020-08-01T14:34:32+5:302020-08-01T14:38:47+5:30
जिल्हा रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत, उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी होत असताना २९ जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा व्हेंटिलेटर बंद झाल्याने उपचारांविना तडफडून मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पाठोपाठ शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांनीही जिल्हा रुग्णालयात हलगर्जी होत असल्याचा आरोप केल्याने आरोग्याचा विषय तापला आहे.
जिल्हा रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत, उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी होत असताना २९ जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हेंटिलेटरमधील तांत्रिक बिघाडामुळे रुग्ण तडफडत असल्याचे यात दिसत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून आॅक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर अवघ्या २४ तासांत या रुग्णाचा मृत्यूही होतो. हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता.
हाच व्हिडिओ पाहून आ. विनायक मेटे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनासह जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियोजन, कर्तव्यक्षमतेवर टीका केली आहे. रुग्ण तडफडून मरत असतानाही त्यांच्यासह यंत्रणा याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्हेंटिलेटर नसल्याने कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सुविधा, उपचार नसल्याने रुग्ण स्वत:हून इतर ठिकाणी जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. व्हेंटिलेटर, सुविधांसाठी आलेल्या करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई झालेली नाही. हलगर्जीपणा आणि असुविधांमुळेच रुग्ण दगावत असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे.
आरोप निराधार
व्हायरल व्हिडिओ पाहिला. ३० ते ४० सेकंदांसाठी व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट झाले होते. तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केले जात आहेत. रुग्ण तडफडून दगावल्यासह जे इतर आरोप केले आहेत, ते सर्व निराधार आहेत.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड