धक्कादायक, कोरोनाबाधित रुग्णाच्या कानातील बाळींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:59+5:302021-01-16T04:37:59+5:30
बीड : घरी, दुकानात चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; परंतु आता चोरट्यांनी चक्क रुग्णालय टार्गेट केले आहे. एका ...
बीड : घरी, दुकानात चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; परंतु आता चोरट्यांनी चक्क रुग्णालय टार्गेट केले आहे. एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या कानातील ४ ग्रॅम सोन्याच्या बाळी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर बीड शहर पोलिसांनी टोलवाटोलवी केली. जिल्हा रुग्णालयातील या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलिसांबद्दल रोष आहे.
वडवणी तालुक्यातील बाबूराव सवासे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सीटीस्कॅन केल्यानंतर न्यूमोनिया असल्याचे समजले. कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते. रुग्ण दाखल होताना त्यांच्या कानात बाळ्या होत्या परंतु नंतर ते बाधित आढळल्याने नातेवाईकांना आत जाण्यास बंदी घातली. २९ डिसेंबरला मुलाने विनंती केल्यावर त्याला मध्ये सोडण्यात आले. यावेळी त्यांच्या कानात बाळ्या नसल्याचे समोर आले. त्याने तत्काळ पोलीस चौकीत धाव घेतली. परंतु येथील कर्मचाऱ्यांनी तुम्ही तुमचे पहा. ते काम आमचे नाही, असे सांगून अरेरावी केली. नंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावर येथील जोगदंड नामक पोलिसाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करून परत पाठविले. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार देण्यास गेल्यावर येथील शिपायांनी त्यांना भेटच होऊ दिली नाही. त्यामुळे नातेवाईक वैतागले असून याची वेळीच चौकशी करून शोध न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकाराने जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.
कोट
या प्रकरणात सर्व माहिती घेतो. याची चाैकशी केली जाईल.
रवी सानप
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड
कोट
माझे वडील ॲडमिट करताना त्यांच्या कानात सोन्याच्या बाळी होत्या नंतर भेटायला गेल्यावर त्या नव्हत्या. पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी तक्रार घेतली नाही. सीएसकडे शिपायांनी जावू दिले नाही. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आहे.
दत्ता सवासे
नातेवाईक