पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 20:16 IST2020-07-03T20:07:57+5:302020-07-03T20:16:48+5:30
वडवणी तालुक्यातील चिखलबीडची घटना

पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या
बीड : वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून तिच्या वडिलांनीच केला होता. दरम्यान पोलिसांनी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वडवणी तालुक्यातील पिंपळा येथे शीतल दादासाहेब तोगे (वय १४) या विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता. वडवणी पोलिस ठाण्याचे सपोनि महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून तिचे वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी मंगळवारी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला गेला होता. यानंतर तपासाची चक्रे गतिमान झाली अन् पोलिसांच्या चौकशीत वडिलांनी खून केल्याचे समोर आले.
दरम्यान खूनाचे कारण विचारले असता, शीतल ही सारखी आपल्या माहेरी येत होती. तिला वारंवार परत सासरी नेऊन सोडले तरी देखील करमत नसल्याचे सांगून ती परत येत होती. याला कंटाळून गळा दाबून खून केल्याचे वडिलांनी सांगितले. दरम्यान आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.