धक्कादायक ! बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 04:55 PM2019-07-11T16:55:31+5:302019-07-11T17:00:02+5:30
दुष्काळामुळे शेतीत काहीही पिकले नाही आणि मजुरीही मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत आत्महत्या
बीड : बीड तालुक्यातील ईट येथील आसाराम रावसाहेब नरनाळे या शेतकऱ्याने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हृदयस्पर्शी दुर्देवी घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आसाराम नरनाळे यांचेकडे ईट येथे एक एकर शेती आहे, शेतीसह मोलमजुरी करून ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. दुष्काळामुळे त्यांच्या शेतीत काहीही पिकले नाही, तसेच मजुरीही मिळत नसल्याने रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील त्यांच्याकडे राहत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली.
शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे.२०१८ साली विविध कारणांमुळे १९१ शेतकऱ्यांनी आत्हत्या केल्या होत्या, पैकी १५० पेक्षा अधिक प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरले होते.