धक्कादायक, स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षा रामभरोसे - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:28 AM2021-01-14T04:28:07+5:302021-01-14T04:28:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : भंडारा येथील दुर्घटनेनंतरही बीडचा आरोग्य विभाग गाफील असल्याचे दिसत आहे. अगाेदर तर नव्हतेच परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भंडारा येथील दुर्घटनेनंतरही बीडचा आरोग्य विभाग गाफील असल्याचे दिसत आहे. अगाेदर तर नव्हतेच परंतु आताही स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात आग लागली तर विझविण्यासाठी काहीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या हजारो रुग्णांचा जीव धोक्यात आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांना कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसते.
कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयातील ओपीडी व आयपीडी हे विभाग आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. येथे रोज शेकडो रुग्ण येत असतात तर ओपीडीची संख्याही ५००पेक्षा जास्त असते. परंतु, येथे येणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल प्रशासन पूर्णपणे गाफील असल्याचे दिसत आहे. भंडारा दुर्घटनेनंतर केवळ नवजात शिशू कक्षाचाच आढावा घेण्यात आला. आयपीडी व ओपीडीतील रुग्णांबाबत आरोग्य विभाग गाफील आहे. येथील एकाही प्रभागामध्ये अग्निरोधक यंत्र अथवा पाण्याची कसलीही व्यवस्था नसल्याचे दिसत आहे. तसेच वायरिंगही विस्कळीत झालेली असून, सर्वत्र शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. असे असतानाही यावर उपाययोजना करण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो रुग्णांचा जीव धोक्यात आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे.
गाद्या फाटलेल्या, बेडशीटही नाही
याच रुग्णालयात बेडवर गाद्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बेडशीटही नाहीत. नातेवाईक घरून कपडा आणून बेडवर टाकत असल्याचे दिसते. लाखो रूपये रुग्णांच्या सुविधांसाठी येतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांना काहीच मिळत नसल्याचे यावरून दिसून आले.
परिचारिका म्हणतात, आम्हाला माहिती नाही
बेडशीटबद्दल परिचारिकांना विचारले असता, रुग्ण, नातेवाईक बेडशीट काढून टाकत असल्याचे सांगितले. तर अग्निरोधक यंत्राबद्दल विचारले असता, येथे काहीच नाही, असे सांगितले. एखादी दुर्घटना घडल्यावर काय करायचे, याची माहिती अथवा प्रशिक्षणही दिले नसल्याचे त्यांनी मान्य केले. या रुग्णालयात केवळ रुग्णांनाच नव्हे तर डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरूनच काम करावे लागत आहे.
कोट
स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्र नाहीत, हे खरे आहे. तसेच इतर दुर्घटना घडल्यासही पाणी नाही. ही इमारत आदित्य शिक्षण संस्थेची आहे. अगोदरही येथे काही नव्हते. नंतर आम्हीही बसविले नाही. भंडारा घटनेनंतर बसविण्याबाबत नियोजन आहे. दोन-तीन दिवसात बसवू.
डॉ. सुखदेव राठोड
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड