धक्कादायक ! कोरोना अहवाल प्रतीक्षेत तरी एसटीच्या चालक-वाहकांना कर्तव्यावर जाण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 03:44 PM2021-04-20T15:44:34+5:302021-04-20T15:45:14+5:30
एसटी महामंडळाच्या धोरणाने माजलगावात कोरोना महामारी वाढण्याची शक्यता
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : दोन आठवड्यापूर्वी मुंबईतील बेस्टला सेवादेण्यासाठी माजलगाव आगारातील 22 चालक-वाहक पाठवले होते. परवा माजलगावात आल्यानंतर त्यांचा स्वॅब घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आला. परंतु, अहवाल आणखी प्रतीक्षेत असतानाही आगाराने वाहक-चालकांना कर्तव्यावर जाण्याची सक्ती केली आहे. एसटी महामंडळाचे हे धोरण माजलगावात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजलगाव आगाराचे वाहक - चालक यांना मुंबईतल्या बेस्ट बसला सेवा देण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून जात आहेत. पंधरा दिवसाला 22 वाहक - चालक आलटुन पालटुन जातात. त्याच प्रमाणे 10 एप्रिल रोजी हे वाहक - चालक गेलेले होते. त्या ठिकाणी कर्तव्य पार पडल्यानंतर मुंबईहून परतआल्यानंतर रविवारी कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पाठवले होते. परंतु त्यांचा अहवाल मंगळवारी येणार होता. अहवाल येण्यापूर्वीच वाहक -चालकांना नवीन येणाऱ्या आधुनिक बसच्या प्रशिक्षणासाठी यांना पाठवण्यात आले. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना होम कोरोन्टाईन करणे गरजेचे आहे.
परंतु, तसे न करता येथील आगार प्रमुखांनी त्यांना कार्यावर पाठवले. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची वाढती संख्या आणि त्या ठिकाणी कर्तव्य करून आलेल्या त्या 22 वाहक-चालकांचा दोन आठवडे त्याठिकाणी वावर असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज सकाळपासून त्या बावीस वाहक-चालकांसोबत इतर 16 वाहक-चालक प्रशिक्षणासाठी जात आहेत. सदरील त्या बावीस चालक-वाहकाच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा न पाहता माजलगाव आगाराने घेतलेला निर्णय कोरोना महामारी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
भितीचे वातावरण
कोरोना अहवाल येण्यापूर्वीच आम्हाला प्रशिक्षणाला वाढवण्यात येत आहे. आम्ही तिकडे जात आहोत.मात्र, आमच्यामुळे नागरीकांची व आमच्या कुटुंबातील सदस्यांन धोका असल्याने भिती वाटत असल्याचे हे वाहक - चालक सांगत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भितीचे वातावरण दिसत होते.
'त्या' चालक-वाहकांचा रिपोर्ट निगेटिव्हच!
बेस्टची मुंबईवरून कर्तव्य बजावुन आलेल्या त्या 22 वाहनचालकांचा टेस्ट करण्यात आली होती. कोरोना अहवाल अद्याप हातात पडला नाही.परंतु आम्ही कोव्हीड सेंटरला संपर्क केला असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे त्या वाहक-चालकांना शिवशाही बस प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.
- दत्तात्रय काळम पाटील , आगार प्रमुख