धक्कादायक ! दुधाच्या पाऊचमध्ये कोंबडीचा पीस; डेअरीचे म्हणणे, 'दुध स्वच्छ, पाऊच खराब'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:58 PM2020-12-21T12:58:58+5:302020-12-21T13:00:41+5:30
दुधाला वाढती मागणी असल्याने अनेक दूध डेअरीकडून त्याची पाऊचमध्ये विक्री केली जात आहे.
केज : रुपमाता डेअरीच्या दुधाच्या पाऊचमध्ये कोंबडीचा पीस आढल्याची खळबळजनक घटना केज शहरात रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे डेअरीकडून दूध आणि पाऊचच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहकाने सांगितले आहे. तर दुध स्वच्छ असून पाऊच अस्वच्छ आले असल्याचे स्पष्टीकरण डेअरीतर्फे देण्यात आले आहे.
दुधाला वाढती मागणी असल्याने अनेक दूध डेअरीकडून त्याची पाऊचमध्ये विक्री केली जात आहे. मात्र, पाऊचमधील दुधाची स्वच्छता जपली जात नसल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. सादेक शेख यांनी केज शहरातील एका दूध विक्री करणाऱ्या सेंटरमधून रुपमाता डेअरीचा दुधाचा छोटा पाऊच रविवारी ( दि. 20) खरेदी केला. यावेळी पाऊचमध्ये त्यांना चक्क कोंबडीचा पीस आढळून आला. याबाबत रूपामाता दूध डेअरीचे मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी शेख यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी दाद मागण्यासाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे व पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहक सादेक शेख यांनी लोकमतला सांगितले.
दुध स्वच्छ, पाऊच खराब
मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांनी डेअरीचे दूध स्वच्छ आहे, मात्र पॉलिथीनच्या पाऊच रोलला कोंबडीचा पीस चिटकून आला असावा. यापुढे सतर्क राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊच पुरवणाऱ्या कंपनीकडे याची तक्रार केली आहे, असे स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.