धक्कादायक... आरोग्य विभागाकडे नाही बोगस मुन्नाभाईंची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:24+5:302021-09-12T04:38:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यात कोणत्या गावात, शहरात किती वैद्यकीय व्यवसाय करणारे लोक आहेत याची माहिती आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यात कोणत्या गावात, शहरात किती वैद्यकीय व्यवसाय करणारे लोक आहेत याची माहिती आरोग्य विभागाकडे असणे बंधनकारक आहे; पण काही अधिकृत दवाखान्यांची नोंद सोडता इतर ठिकाणच्या शहर, गाव, खेड्यांत बस्तान बसविलेल्या बोगस मुन्नाभाईंची आरोग्य विभागाकडेच नोंद व माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील अनेक गावांत कोणतीही पदवी नसताना बोगस मुन्नाभाईंनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना हाताशी धरून दवाखाने थाटले आहेत. यातून नागरिकांवर ते जीवघेणे उपचारदेखील करतात. एवढेच नाहीतर गंभीर स्वरूपाचे ऑपरेशनदेखील ते त्याच ठिकाणी करीत असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस मुन्नाभाईंची नोंद ज्या त्या आरोग्य केद्र, उपक्रेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील कर्मचाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. तशी माहिती तालुका आरोग्य कार्यालयाला कळवायला हवी; पण आष्टी तालुक्यातील अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काही दवाखान्यांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे; पण अनेक वर्षांपासून तालुक्यात बोगस मुन्नाभाई रुग्णसेवा करत आहेत. ते कोणत्या गावात प्रॅक्टिस करतात, कधीपासून करतात, तिथे कोणते उपचार केले जातात, त्यांच्याकडे नोंदणीकृत पदवी आहे का? याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी असायला हवी; पण ती का नाही? टाळाटाळ का? एखाद्याचा जीव गेल्यावर जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तालुक्यातील आरोग्य विभागाचे किती दुर्लक्ष आहे. हे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांंनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दीपक गरुड यांनी केली आहे.
...
अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दवाखान्याची नोंद आहे; पण बोगस डॉक्टरांची नोंद नाही. मी वैद्यकीय अधिकाऱ्यांंना याप्रकरणी बोलून माहिती घेईन.
-डाॅ. जयश्री शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी