धक्कादायक; आरोग्य विभागाने लपवले १०५ कोरोना बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:59+5:302021-05-09T04:34:59+5:30
लोकमत एक्सक्लुझिव्ह सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात काेरोनाच्या वाढत्या रूग्णांसह मृत्यूही होत आहेत. ते रोखण्यात आरोग्य ...
लोकमत एक्सक्लुझिव्ह
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात काेरोनाच्या वाढत्या रूग्णांसह मृत्यूही होत आहेत. ते रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासनाला अपयश येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड झाले आहे. बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद आहे. यावरून १०५ कोरोना बळींचा आकडा दडविल्याचे सिद्ध होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रोज १,३००पेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. मृत्यूंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा हा संसर्ग ‘ब्रेक’ करण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जास्तीत जास्त रूग्णांची चाचणी करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आव प्रशासन आणत आहे. तर दुसऱ्या बाजूला रोजच्या उपचारातील दुर्लक्ष आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्मशानात मृतदेहांच्या रांगा लागत आहेत. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते आणि ती करत असल्याचे आरोग्य विभाग सांगतोय. परंतु, यात खोलवर जावून माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
दरम्यान, बीड व अंबाजोगाईत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. एप्रिल महिन्यात बीडमधील भगवानबाबा स्मशानभूमीत ११४ तर अंबाजोगाईतील स्मशानभूमीत २६४ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नगरपालिकेत आहे. तर दुसऱ्या बाजूला याच महिन्यात आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे १०५ मृत्यू लपविल्याचे उघड होत आहे. आरोग्य विभाग व प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी हा आटापिटा करत असल्याचा आरोप सामान्यांमधून केला जात आहे.
माहिती अपडेटकडे दुर्लक्ष
ज्या संस्थेत रूग्ण मयत झाला अथवा कोरोनामुक्त झाला, त्यांनी तत्काळ माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक आहे. परंतु, काही संस्था ती अपडेट करण्याकडे दुर्लक्ष करतात. असे असले तरी ५ ते १० मृत्यूंचा फरक येऊ शकतो. परंतु, या एकाच महिन्यात तब्बल १०५ मृत्यूंची तफावत आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
...
काय म्हणतात अधिकारी...
मी सध्या औरंगाबादला आहे. याबाबत माहिती घ्यावी लागेल. डॉ. खैरे तपासून सांगतील. मी नंबर पाठवतो, त्यांना बोला.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.
.....
अनेकदा संस्था उशिरा माहिती अपडेट करतात. इतर जिल्ह्यांतील लोकांचाही यात समावेश असू शकतो. परजिल्ह्यातील मयतांचे बीडमध्ये अंत्यसंस्कार होत असले, तरी पोर्टलवर त्यांच्याच जिल्ह्यात नोंद होते. परंतु, एवढा मोठा फरक कसा आला, याची माहिती घेतली जाईल. प्रत्येक नगरपालिकेला पत्र पाठवून यादी मागवली जाईल.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
....
बीड शहरातील संत भगवानबाबा स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत २७३ अंत्यसंस्कार झाले असून, यात केवळ एप्रिल महिन्यातील ११४ अंत्यसंस्कारांचा समावेश आहे. एका अंत्यसंस्कारासाठी किमान ६ हजार रूपयांपर्यंत खर्च येतो.
- डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड.
.....
१ ते २० एप्रिल दरम्यान अंबाजोगाई नगरपालिकेकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २६४ सर्वधर्मीय व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
- अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगरपालिका, अंबाजोगाई.
---------------
एप्रिल महिन्यातील आकडेवारी
आरोग्य विभागाकडे नोंद झालेले मृत्यू - २७३
---
अंत्यसंस्काराची आकडेवारी
बीड ११४
अंबाजोगाई २६४
एकूण ३७८
---
अंत्यसंस्कार व नोंदीतील तफावत असलेला आकडा - १०५
------
एप्रिल महिन्यात संस्थानिहाय मृत्यूंची नोंद
स्वाराती, अंबाजोगाई १२१
जिल्हा रूग्णालय, बीड ११५
लोखंडी सावरगाव ८
खासगी रूग्णालय १५
इतर जिल्ह्यांत ६
अगोदरच्या महिन्यातील नोंद ८
एकूण २७३.
===Photopath===
080521\08_2_bed_12_08052021_14.jpeg
===Caption===
२५ एप्रिल रोजी एकाच दिवशी अंबाजोगाईतील स्मशानभूमित २८ मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले होते. स्मशानातही हे छायाचित्र.