धक्कादायक ! पती-पत्नीचा वाद, पोलीस अधीक्षक कार्यालयातच पतीने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 03:42 PM2021-01-05T15:42:19+5:302021-01-05T15:45:38+5:30
poison taken by husband in Beed Superintendent of Police's office : दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले.
बीड : पती-पत्नी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात ४ जानेवारी रोजी बोलावले होते. समुपदेशन सुरू होते. याचवेळी पतीने कक्षाच्या बाहेर येत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इम्तीयाज कुरेशी (३०, रा.गेवराई) असे विष घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इम्तीयाज यांचा १० वर्षांपूर्वी गेवराई शहरातीलच मुलीशी विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस आनंदाने गेले. त्यांना दोन अपत्येही आहेत. परंतु, मागील वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडू लागले. त्याची पत्नी माहेरी गेली. त्यानंतर तिने महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज दिला. दोन वेळा समुपदेशन करून सोमवारी तिसरी तारीख होती. दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. येथील महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याला तात्काळ जुन्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
कक्षात नेमके झाले काय?
इम्तीयाजसोबत संसार करण्यास तयार आहे, परंतु तो नकार देत आहे. सोमवारी तिसरी तारीख असल्याने आम्ही आलो होतो. अचानक बोलणे चालू असतानाच त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे इम्तीयाजची पत्नी माध्यमांना सांगत होती. जिल्हा रुग्णालयात ती आपल्या चिमुकल्यासह पतीला आधार देण्यासाठी आली होती.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ
सध्या जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. अचानक हा रुग्ण ओपीडी क्लिनीकमध्ये आल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. परंतु, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. डॉ.स्वप्निल बडजाते, डॉ.कमलाक्षी काकडे, परिचारिका शमा गुजर, विक्रांत पाखरे, कॉलमन गणेश पवार, गोरक्षनाथ घोलप, रोहित घनघाव, बाळकृष्ण पवार यांनी त्याला उपचार करून स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याची ॲॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.