धक्कादायक, शिक्षण संस्थेला बनविले दारूचा अड्डा -फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:37+5:302021-01-01T04:22:37+5:30
रिॲलिटी चेक बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी करणाऱ्या कक्षसेवक ते डाॅक्टर पर्यंतच्या सर्वांनाच राहण्यासाठी वसतिगृह व नर्सिंग ...
रिॲलिटी चेक
बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी करणाऱ्या कक्षसेवक ते डाॅक्टर पर्यंतच्या सर्वांनाच राहण्यासाठी वसतिगृह व नर्सिंग महाविद्यालयाची इमारत दिली होती. परंतु येथे चक्क दारूच्या घोटाला चकण्याचा आधार देत सर्वत्र घाण केल्याचे समाेर आले आहे. पवित्र शिक्षण संस्थेला काही मद्यपी कर्मचारी, डॉक्टरांनी दारूचा अड्डा बनविले आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा संसर्ग पाहता कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मुलींचे वसतिगृह व नर्सिंग महाविद्यालयाची इमारत दिली होती. येथे त्यांना आरोग्य विभागाकडूनच जेवणही दिले जात होते. आता महाविद्यालये सुरू होत असल्याने ही जागा रिकामी केली जात आहे. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सर्वत्र घाण केल्याचे उघड झाले आहे. जेवणाची नासाडी करून सर्वत्र मास्क, कपडे, कचरा पडलेला दिसला. तसेच काहींनी तर येथे दारू ढोसल्याचेही उघड झाले आहे. दारूच्या बाटल्याही येथे आढळल्या. ज्ञान देणाऱ्या या पवित्र इमारतीला दारूचा अड्डा बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मागील आठ ते दहा महिन्यांपासून याकडे आरोग्य विभागातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. आता ही स्वच्छता करण्यासाठीच आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे.
राजकीय लोकांचा हस्तक्षेप
महाविद्यालयातील कक्षसेवक व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले. यावर काही स्थानिक नेत्यांनी येथे राजकारण सुरू केले. संबंधित प्रमुख व अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. केवळ चमकोगिरी करण्यासाठी या पुढाऱ्यांकडून असे प्रकार केले जात असल्याचे दिसते. याच लोकांचा आधार घेत काही कर्मचारी खोली रिकामी करत नसल्याचे सामजते.
कोट
वसतिगृहात विद्यार्थिनींना राहण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच वर्ग सुरू करण्यासाठी पत्र मिळाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाची इमारत रिकामी केली जात आहे. सर्व स्वच्छता करूनच वर्ग सुरू केले जातील.
डॉ.सुवर्णा बेदरे
प्राचार्या, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, बीड