धक्कादायक : मुंबईहून आलेल्या मानसिक रुग्णाचा बीडमध्ये क्वारंटाईन असताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 03:49 PM2020-05-25T15:49:36+5:302020-05-25T15:49:41+5:30
मयताला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. लक्षणे नसली तरी इतिहास पाहून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे.
बीड : चार दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या ४२ वर्षीय मानसिक रुग्णाचा क्वारंटाईनमध्ये असताना घरातच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी बीड तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे. त्याला प्रवासाचा इतिहास असल्याने स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा अहवाल येईल.
राजुरी येथील एक कुटूंब मुंबईला वास्तव्यास आहे. कोरोनाच्या भितीने ते २० मे रोजी गावी आले होते. यामध्ये दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश होता. या सर्वांना गावाच्या बाहेर क्वारंटाईन करण्यात आले होते. यात ४२ वर्षीय व्यक्तीला मानसिक आजार होता. त्याला औषधोपचारही चालू होते. आरोग्य विभागाच्या पथकाकडून त्यांना भेटी देण्यासह तपासणी केली जात होती. यात कोणालाही लक्षणे दिसली नाहीत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास या व्यक्तीची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून इतर नातेवाईकांनी सरपंचाला संपर्क केला. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात आणले. येथे तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.
स्वॅब घेतला; अहवालाची प्रतिक्षा
मयताला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. लक्षणे नसली तरी इतिहास पाहून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा स्वॅबचा अहवाल येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात बाधितांची संख्या ४७
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. यात एक कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झाला आहे. सहा रुग्ण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी आणखी नव्याने कोरोना संशयित असलेल्या ५६ लोकांचे स्वॅब घेतले आहेत.