धक्कादायक ! अंगणवाडी सेविकांच्या ग्रुपवर अधिकाऱ्याने टाकला अश्लील फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 08:32 PM2020-07-23T20:32:14+5:302020-07-23T20:33:38+5:30
याच अधिकाऱ्यावर यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे.
बीड : शासकीय कामासाठी तयार केलेल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर अंघोळ करतानाचा अश्लिल फोटो टाकल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. या प्रकरणी शहर विभागाच्या महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात संताप व्यक्त करीत इतर अधिकारी व अंगणवाडी सेविकांनी तक्रार केली. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची मागणी केली असून रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शासकीय कामात त्वरित व वेळेत संदेश जावा, यासाठी प्रत्येक जण कार्यालयाचा गु्रप तयार करीत आहेत. महिला बाल प्रकल्प विभागानेही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविकांचा ‘बीड आयसीडीएस अर्बन’ या नावाने ग्रुप तयार केला. यात बीड शहर, गेवराई, माजलगाव, धारूर येथील अनेक महिला अधिकारी, कर्मचारी जोडलेल्या आहेत. याच गु्रपवर महिला बालप्रकल्प अधिकाऱ्याने आंघोळ करतानाचा अश्लिल फोटो टाकला. त्यानंतर या ग्रुपमधून काही क्षणातच महिला बाहेर पडल्या. त्यांनी याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या अधिकाऱ्यावर निलंबन कारवाईसह गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे. तक्रारीवर सहा महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यापूर्वीही गुन्हा दाखल
याच अधिकाऱ्यावर यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचे निलंबन झाल्यानंतर तो पुन्हा बीडला आला. आता पुन्हा असे गैरकृत्य त्याने केले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नियमांनुसार कारवाई होईल
बीड शहरातील महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आली आहे. या संदर्भात नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
- आर. डी. कुलकर्णी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बीड.