धक्कादायक; औषधी भांडारमध्ये आकडा टाकून वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:34 AM2021-04-08T04:34:04+5:302021-04-08T04:34:04+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन सोमनाथ खताळ बीड : आरोग्य विभागातील रोज नव्या चोऱ्या समोर येत आहेत. रुग्णवाहिकेतील डिझेल चोरीचे प्रकरण ...
लोकमत स्टिंग ऑपरेशन
सोमनाथ खताळ
बीड : आरोग्य विभागातील रोज नव्या चोऱ्या समोर येत आहेत. रुग्णवाहिकेतील डिझेल चोरीचे प्रकरण ताजे असतानाच, आता औषधी भांडारमध्येही आकडा टाकून वीजचोरी केली जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले आहे. महावितरणकडे पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याने ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या जागेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे औषधी भांडार तयार केलेले आहे. याचे काम पूर्ण होऊन साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वीच येथे औषधी ठेवण्यास सुरुवात झाली. सध्या हे भांडार औषधांनी भरले असून, येथे वीजपुरवठा अनधिकृतपणे घेतलेला आहे. महावितरणकडे २४ मार्चलाच २० हजार रुपयांचे कोटेशन भरलेले आहे. असे असतानाही केवळ मीटर उपलब्ध नाही, असे कारण दाखवित नवे कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून आरोग्यातील अनेक विभागांत वीजचोरी होत आहे. याकडे अभियंता आणि लाइनमनचेही दुर्लक्ष होत आहे. सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महावितरणला आरोग्य विभागातील वीजचोरी दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सीईओंच्या भेटीत प्रकार उघड
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेताना, या औषधी भांडारला भेट दिली होती. याच वेळी हा सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर, पाठपुरावा करूनही महावितरणकडून कसलाच प्रतिसाद दिला जात नाही. केवळ ‘वसुली’वर भर देत नवे वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे.
सामान्यांना दिली जाणारी लसही येथेच सामान्यांना दिली जाणारी कोरोना लस याच भांडारमध्ये आहे. येथे पाच कोल्ड स्टोरेजमध्ये लस ठेवलेली आहे. वीज गेल्यावर येथे बॅकअपची व्यवस्थाही नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित आणि असुरक्षित, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काय म्हणतात, अभियंता...
आरोग्य विभागाचे कोटेशन आलेले आहे. कोटेशन आल्यापासून किती दिवसांत कनेक्शन द्यायला पाहिजे, याचा नियम बघून सांगावा लागेल. सध्या मीटर उपलब्ध नसून झोन कार्यालयाकडून मागविले आहेत. याबाबत भांडार विभागाला बोलणेही झाले आहे. वीजचोरीबद्दल माहिती नाही. तसे असेल तर उद्या जाऊन पाहणी करू. एक-दोन दिवसांत त्यांना मीटर उपलब्ध करून देत कनेक्शन दिले जाईल, अशी प्रतिक्रिया बीडचे अति.कार्यकारी अभियंता सुयोग पाटाणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट
२४ मार्च रोजी महावितरणला २० हजार रुपये कोटेशन भरले आहे. सोमवारी ते कनेक्शन देणार होते, परंतु अद्याप मीटर बसलेले नाही. मीटर उपलब्ध नसून झोन ऑफिसला मागणी केल्याचे सांगत आज उद्या येईल, असे आम्हाला सांगण्यात आले.
योगेश जोशी, औषध निर्माण अधिकारी, औषधी भांडार जि.प.बीड
===Photopath===
070421\072_bed_17_07042021_14.jpeg~070421\072_bed_16_07042021_14.jpeg
===Caption===
औषधी भांडारमध्ये लस ठेवलेले ठिकाण... येथे कायम वीजेची आवश्यकता असते.~आरोग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये आकडा टाकून वीज घेतली आहे. त्याचे हे बोलके छायाचित्र.