धक्कादायक : कोरोना वॉर्डमधून रेमडेसिविर चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:06+5:302021-05-10T04:34:06+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधून परिचारिकेची नजर चुकवून एका नातेवाइकाने रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केली. हा प्रकार रविवारी ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधून परिचारिकेची नजर चुकवून एका नातेवाइकाने रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केली. हा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजता उघडकीस आला. यात पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन भरलेल्या इंजेक्शनसह दोन रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, कारवाईबाबत आरोग्य विभागाने पोलिसांना पत्रही दिले आहे.
सध्या कोरोनावर उपचारात लाभदायक म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनला जास्त मागणी आहे. याच इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काळ्या बाजारात याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच नोंदणी करूनही लोकांना हे इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले आहे. असे असतानाच बीड जिल्हा रुग्णालयातून एका रुग्णाच्या नातेवाइकाने परिचारिका दुसऱ्या रुग्णावर उपचार करीत असल्याचे पाहून ट्रॉलीवर ठेवलेले इंजेक्शन खिशात घालत पळ काढला. हा प्रकार परिचारिकेच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कल्पना दिली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार दिली. शल्य चिकित्सक यांनी बीड शहर पोलिसांना कारवाईबाबत पत्र देताच तपास गतीने सुरू झाला. पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुस्ताफा शेख यांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन वापरलेले व एक भरलेले रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी बीड शहर पोलिसांना पत्र दिले असले तरी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
....
आरोग्य विभागाची तक्रार येताच संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रेमडेसिविरच्या तीन बाटल्या जप्त केल्या. यात एक न वापरलेल्या इंजेक्शनचा समावेश आहे. फिर्याद देण्यासाठी यावे, असा निरोप एसीएस यांच्याकडे दिला आहे. सध्या संशयित आरोपी ताब्यात आहे.
-मुस्ताफा शेख, सहायक पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड.