धक्कादायक; बीडमध्ये पाच दिवसाला एक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:36 AM2018-09-03T01:36:49+5:302018-09-03T01:37:51+5:30
बीड जिल्ह्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील पाच वर्षांत बलात्काराच्या ३६३ तर विनयभंगाच्या १२२१ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पाच दिवसाला एक बलात्कार, तर तीन दिवसाला विनयभंगाच्या दोन घटना घडत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बीड : जिल्ह्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील पाच वर्षांत बलात्काराच्या ३६३ तर विनयभंगाच्या १२२१ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पाच दिवसाला एक बलात्कार, तर तीन दिवसाला विनयभंगाच्या दोन घटना घडत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धक्कादायक म्हणजे बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी हे नात्यातील व ओळखीचेच असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आरोपींना शिक्षेपर्यंत कसे पोहचविले जाईल यासाठी पोलिसांकडून कसोशिने प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या घटनांमुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शासनाकडून महिला व मुलींवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी विविध माध्यमांमार्फत जनजागृती करुन त्यांना संरक्षण दिले जात आहे. कायद्यातही कडक तरतूद केली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचार काही केल्या कमी होत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. कायद्यात कडक तरतूद झाली असली तरी नराधम व वासनांध झालेल्यांना याचा फारसा फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे.
घरात कोणी नसणे, निर्मनुष्य ठिकाण अशा विविध ठिकाणी संधी साधून नराधमांकडून महिला व मुलींवर अत्याचार केले जात आहेत. याची वाच्यता केली तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे दाखल गुन्ह्यांमधून समोर आले आहे. त्यामुळे महिला व मुली आजही असुरक्षित असल्याचे दिसून येते.
या घटनांना आळा घालण्यासाठी व नराधमांचा कठोर सामना करण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम होण्याची गरज आहे. तसेच आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने लढण्याची तयारी ठेवावी. झालेल्या अन्याय व अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी तात्काळ तक्रार देऊन संबंधिताला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एखाद्या गुन्ह्यात कठोर शिक्षा झाल्याचे पाहून इतर नराधम असा प्रकार करण्यास धजावणार नाहीत. तसेच महिला व मुलींनी स्व-संरक्षणाचे धडेही घेण्याची गरज आहे.
चालू वर्षात ३२ बलात्कार
जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तसेच १३३ विनयभंग झाले आहेत. १३१ विवाहितांचा छळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
छेडछाडीमुळेही भीतीयुक्त वातावरण
एकटी असणे, जबरदस्ती करणे, रस्त्यावरुन जाताना महिला व मुलींची छेड काढली जात आहे. तसेच त्यांच्याकडे वाईट उद्देशाने पाहून लगट केली जाते. यामुळेही महिलांच्या मनात भीतीयुक्त वातावरण आहे. मागील पाच वर्षात तब्बल १२२१ विनयभंगाचे गुन्हे नोंद आहेत.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार
शाळा-महाविद्यालयातील तरुण एकमेकांकडे आकर्षिले जातात. सुरुवातीला त्यांच्यात प्रेम होते. त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध येतात. सुरुवातीला असणारे प्रेम नंतर अत्याचारात बदलते. आपल्यावर जबरदस्ती झाल्याचे समजताच पीडिता तात्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधिताविरोधात फिर्याद दिली. आधी प्रेम आणि नंतर बलात्काराचा गुन्हा अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडलेली आहेत.
महिला व मुलींच्या मनात भीती
शाळा - शिकवणी, महाविद्यालयात जाणाऱ्या मुली तसेच विविध कामांसाठी बाहेर पडणाºया महिला या मनात भीती घेऊनच घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. आपले काम आटोपून आपण घरी सुरक्षित कधी पोहचू याबाबत त्यांच्या मनांत चिंता असते. ठिकठिकाणी महिला व मुलींना वासनांध पुरुषांच्या वाईट नजरेचे शिकार बनावे लागत आहे.
चार भिंतीत विवाहितांचा छळ
लग्नानंतर काही दिवसच विवाहितांना चांगली वागणूक दिली जाते. त्यानंतर हुंडा व इतर कारणे पुढे करीत माहेरहून पैसे आणण्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. त्यांना उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलले जाते. पाच वर्षांमध्ये तब्बल १६९८ विवाहितांचा छळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यावरुन चार भिंतीतही महिलांचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे.
ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक अन्याय - अत्याचार
महिला व मुलींवर अत्याचार केलेल्या घटनांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच गुन्हे अनोळखी लोकांकडून घडले आहेत. अन्यथा बाकी सर्व नात्यातील किंवा ओळखीच्याच लोकांचा आरोपीत समावेश आहे. सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर अत्याचार करायचा असा काहीसा प्रकार घडल्याचे गुन्हे आहेत.
पोलीस महासंचालकांकडून विभागप्रमुखांना आदेश
लैंगिक छळाच्या घटनांमध्ये स्थानिक पातळीवर गांभिर्याने पाहिले जात नाही. दोषारोपपत्र पाठविताना अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाने त्याची संपूर्ण तपासणी करणे आवश्यक असल्याची सूचना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने पोलीस महासंचालकांना केली आहे. हाच धागा पकडून पोलीस महासंचालकांकडे मॅटच्या या सूचनांकडे गांभिर्याने पाहण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना नुकतेच दिले आहेत. त्या दृष्टीने बीड जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे.