धक्कादायक ! चक्क जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीवर ‘आंबट चाळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:21 PM2019-11-05T14:21:19+5:302019-11-05T14:23:31+5:30
मध्यरात्री दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर आंबट चाळे करताना पकडले गेले.
बीड : जिल्हा रूग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरूवारी मध्यरात्री दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर आंबट चाळे करताना पकडले गेले. या प्रकाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
बीड जिल्हा रूग्णालयाच्या दोन इमारती आहेत. एका इमारतीत ओपीडी आणि प्रशासकीय कारभार चालतो. तर दुसऱ्या अॅडमिट असलेल्या रूग्णांवर उपचार केले जातात. गुरूवारी मध्यरात्री वॉर्ड क्रमांक सहा जवळील जिन्यावरून दोन पुरूष व एक महिला इमारतीच्या छतावर गेले. तेथे मद्यप्राशन करून आंबट चाळे केल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. हा प्रकार एका कर्मचाऱ्याला समजताच त्यांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. बॅटरीच्या उजेडात रक्षकांना हे तिघेही तेथे आढळले. विशेष म्हणजे एक पुरूष आणि महिला नग्न अवस्थेत होते. त्यानंतर रक्षकांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. पहाटे चार वाजेच्या सुमारास या तिघांनाही शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कोणाची तक्रार नसल्याचे सांगून त्या सर्वांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
प्रकरणात झाली ‘तडजोड’?
गैरप्रकार करणाऱ्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नसल्याचे सांगत सोडून देण्यात आले. यात ‘लाख’मोलाची ‘तडजोड’ झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे त्यांना सोडून देताना रूग्णालय प्रशासनाची तक्रार आहे की नाही, हे विचारण्याची तसदीही पोलिसांनी घेतलेली नाही.
माहितीच्या लोकांचेच गैरकृत्य
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही लोक तेथेच असतात. खाजगी वाहन चालक असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सर्व लोक कायम रूग्णालयाच्या आवारातच वावरत असतात. त्यांनाच रूग्णालयाची सर्व माहिती असल्याने त्यांनी नजर चुकवून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलेची नसली तरी रूग्णालयाने करावी तक्रार
पोलिसांनी महिलेची तक्रार नसल्याचे सांगून सर्वांना सोडून दिले. मात्र, विनापरवाना शासकीय इमारतीत जाणे, मद्यप्राशन करणे व इतर गैरप्रकार करणे चुक आहे. त्यामुळे रूग्णालय प्रशासन तक्रार करू शकते. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता यामध्ये रूग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासन कशाप्रकारे कारवाई करतात, हे वेळच ठरविणार आहे.
पोलिसांकडे रीतसर तक्रार देणार
जिल्हा रूग्णालयाच्या छतावरील गैरप्रकाराबद्दल समजले आहे. याबाबत पोलिसांकडे रितसर तक्रार करीत आहोत. या प्रकरणाची शहानिशा करीत आहोत.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
तिघांना ताब्यात घेतले
जिल्हा रूग्णालयातून फोन येताच एक महिला व दोन पुरूषांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सर्वांनी मद्यप्राशन केलेले होते. महिलेची तक्रार नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
- घनश्याम अंतराप, सपोनि, शहर पोलीस ठाणे बीड