धक्कादायक ! एक दिवसांपूर्वी रुजू झालेल्या बस चालकाचा आज आगारात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 12:25 PM2021-12-09T12:25:11+5:302021-12-09T12:25:38+5:30
आज साप्ताहिक सुटी असतानाही कामावर बोलवले होते
परळी ( बीड ): बुधवारी रुजू होऊन परळी-बीड बस सेवा देणारे एसटी चालक नागनाथ गित्ते ( ४६, मुळ गाव बेलबां ता. परळी) यांनी आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान परळी बस स्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत प्रशासनाचे धोरण आणि अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
राज्य शासनात एसटी महामंडळ विलीन करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे सध्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान, शासनाने दिलेली पगार वाढ आणि सवलती स्वीकारून काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहेत. परळी आगारातील नागनाथ गित्ते हे चालक देखील बुधवारी रुजू झाले. त्यांनी बुधवारी परळी-बीड अशी बसफेरी करत सेवा दिली.
आज त्यांची साप्ताहिक सुटी होती. मात्र, आगारातील अधिकाऱ्याने त्यांना कामावर बोलावले. यामुळे गित्ते सकाळी ६ वाजता आगारात आले मात्र प्रवेश द्वारावरच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना लागलीच अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गित्ते यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
जवळ सापडली नोट
नागनाथ गित्ते यांच्याजवळ एक चिट्ठी सापडली आहे. यात त्यांनी, ''मी नागनाथ गित्ते, चालक परळी वै, मी प्रशासनाचे धोरण आणि अधिकारी वर्ग यांच्या कारवाईला कंटाळून आत्महत्या करीत आहे.'' असा उल्लेख केला आहे. साप्ताहिक सुट्टी असतानाही दबाव टाकून कामावर बोलावल्याने गित्ते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे एसटी अधिकाऱ्यांचा विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी परळी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.