धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीला तब्बल 10 वर्षांपासून घरात डांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:42 PM2022-04-12T12:42:23+5:302022-04-12T12:43:19+5:30
३५ वर्षीय महिलेला पतीने घरात दहा वर्षांपासून डांबून ठेवल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. संगीता धसे यांना मिळाली होती
बीड: चारित्र्यावर संशय घेऊन तब्बल दहा वर्षांपासून घराबाहेर पडण्याची परवानगी नाकारलेल्या महिलेची पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी ११ एप्रिल रोजी सुटका केली. शहरातील जालना रोडवर हा धक्कादायक प्रकार समोर आला. निष्ठूर पतीने केलेल्या या कृत्याने महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचे भयावह वास्तव उघडकीस आले.
३५ वर्षीय महिलेला पतीने घरात दहा वर्षांपासून डांबून ठेवल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. संगीता धसे यांना मिळाली होती. त्यावरून ११ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात जाऊन याबाबत स्वत: तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना संपूर्ण हकिकत कळवून मदतीची मागणी केली. त्यानुसार हवालदार फेरोज पठाण, एक महिला अंमलदार व सामाजिक कार्यकर्त्या ॲड. संगीता धसे यांनी जालना रोडवरील घरी जाऊन संबंधित महिलेची सुटका केली. महिलेला दोन मुले असून पती सधन आहे. तो कोणताही कामधंदा करत नाही. चारित्र्यावर संशय घेत त्याने १० वर्षांपासून पत्नीला घराबाहेर पडण्यास अटकाव केला होता. अनेकदा तिला मारहाण केली, बांधूनही ठेवले जात असे. दरम्यान, महिलेला ठाण्यात आणले. त्यानंतर तिला उपचाराची गरज असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
संबंधित महिला मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय खचलेली दिसते. तिला तूर्त वैद्यकीय उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. महिला व्यवस्थित बरी झाल्यावर जबाब नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल.
- केतन राठोड, पो.नि. शिवाजीनगर ठाणे
मला दवाखान्यात घेऊन चला...
पोलीस व महिला कार्यकर्त्या घरी पोहोचल्या तेव्हा पती, महिला व त्यांची दोन मुले होती. यावेळी महिलेच्या अंगावर जखमा होत्या. महिला दवाखान्यात घेऊन चला म्हणत तिने रडायला सुरुवात केली. यावेळी १६ व १८ वर्षे वयाची दोन मुलेही आईसोबत आली. ती देखील दडपणाखाली असल्याचे दिसून आली. यावेळी पती नि:शब्द होता.
घरात दुर्गंधी....
मानसिक आजारातून हा सगळा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. घरात सर्वत्र केरकचरा होता. कुबट वास व दुर्गंधी होती. पोषक आहार खायला न मिळाल्याने दोन मुलांसह महिला शारीरिकदृष्ट्या कमकुवत आढळली. तिला स्वत:च्या पायावर चालताही येत नव्हते.
......