धक्कादायक! पोलिसांनी सील केलेल्या तिरूमला ग्रुपच्या साहित्याची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:27 PM2024-12-03T19:27:16+5:302024-12-03T19:27:41+5:30
कथित व्हिडीओ व्हायरल : मतमोजणीच्या दिवशी रात्री घटना घडल्याचा संशय
बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडविल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेटचा अध्यक्ष सुरेश कुटे हा जेलमध्ये आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह पत्नी अर्चना कुटेच्या नावे असलेल्या सर्व मालमत्ता सील केल्या होत्या. आता ते सर्व पोलिसांच्या ताब्यात आहे; परंतु आता याच जप्त केलेल्या मालमत्तांची रात्रीच्या वेळी चोरी केली जात आहे. मतमोजणीच्या दिवशी क्रेन आणि कंटेनरद्वारे कोट्यवधी रुपयांच्या मशिनरी काही लोकांनी चोरून नेल्याचा संशय आहे. याचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, पोलिस काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.
बीडमधील सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट, तर अर्चना कुटे यांनी तिरूमला ग्रुपची उभारणी केली. तिरूमला ग्रुपचे वेगवेगळे प्रॉडक्ट राज्यासह परराज्यँतही जात होते; तर ज्ञानराधाच्याही ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. यात लाखो ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. लोकांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून या ठेवी घेतल्या; परंतु नंतर त्या परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी न्यायालयात, प्रत्यक्षात पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हे दाखल केले. त्याप्रमाणे बीडसह परभणी, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव, लातूर, आदी जिल्ह्यांत सुरेश कुटेसह इतरांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिसांनी बीडसह राज्यभरातील वेगवेगळ्या मालमत्ता जप्त केल्या. परंतु तेथे बंदोबस्तासाठी कोणीही नव्हते. याचाच गैरफायदा घेत काही धनदांडगे लोक आता तिरूमला ग्रुपच्या परिसरात जाऊन तेथील महागड्या मशिनरी क्रेनद्वारे कंटेनर, ट्रकमध्ये टाकून चोरी करत आहेत. याचे कथित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता या प्रकरणात पोलिस गुन्हा दाखल करणार की अभय देणार? याकडे लक्ष लागले आहे.
..तर ठेवीदारांचे पैसे कसे मिळणार?
जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव केला जातो. त्यानंतर तेच पैसे घेऊन ठेवीदारांना परत केले जाणार आहेत, असे आतापर्यंत तरी पोलिस सांगत आहेत; परंतु जर अशा प्रकारे महागड्या मशिनरीची चोरी होत असेल तर या मालमत्तांना भाव काय मिळणार? असा सवाल आहे. जर असे सर्रास होत राहिले तर ठेवीदारांना पैसे परत कसे मिळतील? असा प्रश्न आहे. सध्या तरी या व्हिडीओमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी घेतली गंभीर दखल
याबाबत पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी असे जर झाले असेल तर ते गंभीर आहे, असे सांगितले. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिस आणि संबंधितांना तातडीने सूचना करून चौकशी करण्यास सांगतो, असे ते म्हणाले. अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी आपण सुट्टीवर असल्याचे सांगितले; परंतु सोमवारी येताच या प्रकरणाची चौकशी करून संंबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले.