धक्कादायक ! परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपये कॅपिटेशन फी उकळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:38 PM2020-10-20T16:38:23+5:302020-10-20T16:41:58+5:30
इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली.
परळी : येथील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये प्रतिव्यक्ती शुल्काच्या (कॅपिटेशन फी) नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांचे शुल्क उकळल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ आणि कलम ३ आणि ७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीचे संचालक भास्कर चाटे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ पासून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कनिष्ट महाविद्यालय, परळी येथे इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली. वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वस्तीगृहांच्या इमारतीत शिकवणी वर्ग विद्यमान अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय इटके, कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल व प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांच्यातर्फे चालवले जात आहेत.
सदरील शिकवणी वर्ग हे आॅगस्ट २०१८ साली सुरू केले असून तत्पुर्वी २३ फेब्रुवारी २०१८ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीला संस्थेच्या खात्यातून ८ लाख रुपये व १७ एप्रिल २०१८ रोजी २ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये देण्यात आले. विद्यार्थ्यांकडून जमा केलेले शुल्क सुरुवातीला संस्थेचे बँक खाते क्र.१०१२२१०३७६०७ मध्ये २२ लाख ३५ हजार ८४१ रुपये जमा केले. वैद्यनाथ बँकेतच लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी या नावाने उघडलेल्या खाते क्रं. १०१२३१००४४८८ या खात्यात १ सप्टेंबर २०१८ पासून विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क ८३ लाख ६१ हजार ३४४ रुपये जमा केले. दोन्ही बँक खात्यात मिळून १८ आॅगस्ट २०१८ ते १४ जून २०१९ पर्यंत १ कोटी ६ लाख रुपये जमा केले आहेत.
वसतिगृहात घेतली शिकवणी
जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालय, परळी, संचालक मंडळ, संस्थाचालक तथा अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय इटके, कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल व प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांनी २०१८ पासून इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी व पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅ पिटेशन फी घेऊन वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीत शिकवणी वर्ग चालवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.