धक्कादायक; ‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:28+5:302021-05-21T04:35:28+5:30

सोमनाथ खताळ बीड : बीडमधील मृतदेह अवहेलना प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कोरोनाबाधित असल्याने मृतदेह परत आणून ...

Shocking; ‘That’ woman decided to be coronated without testing! | धक्कादायक; ‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित !

धक्कादायक; ‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित !

Next

सोमनाथ खताळ

बीड : बीडमधील मृतदेह अवहेलना प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कोरोनाबाधित असल्याने मृतदेह परत आणून नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करीत नातेवाइकांवर गुन्हा दाखल करणारा आरोग्य विभाग अडचणीत सापडला आहे. ज्या महिलेचा मृतदेह परत बोलावला, ती कोरोनाबाधित असल्याचा कसलाच पुरावा आरोग्य विभागाकडे नाही. विशेष म्हणजे त्या महिलेची आयसीएमआर पोर्टललाही नोंद नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

लता सुरवसे (वय ३२, रा. कुंभारवाडी, ता. गेवराई) या महिलेचा एचआरसीटी स्कोअर २० आल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. २३ एप्रिलला दाखल झाल्यापासून तिच्यावर कोरोनाबाधित म्हणून उपचारही केले. १७ मे रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारांसाठी गावी गेले. परंतु, प्रशासनाने त्यांना परत बोलावून घेतले. बीडमध्ये नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले; तर जिल्हा रुग्णालयातील नर्सने नातेवाइकांनी वैद्यकीय तपासणी न करता आणि परवानगी न घेता मृतदेह पळविल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकाराने खळबळ उडाली होती.

दरम्यान, ज्या महिलेचा मृतदेह परत आणला, त्या महिलेची कोरोनाबाधित म्हणून कोठेच नोंद नसल्याचे समोर आले आहे. वॉर्डमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मात्र कसलाही पुरावा न पाहता २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार केले आहेत. केवळ केसपेपरवर कोणीतरी पॉझिटिव्ह असे लिहिलेले आहे. वास्तविक पाहता त्याचा रिपोर्ट कोठेच जोडलेला नाही. आयसीएमआर पोर्टलवरही नोंद नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, आरोग्य विभागच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

डॉक्टर म्हणतात, नातेवाइकांचा दबाव

येथील डॉ. गिरीश गुट्टे यांचा जबाब घेण्यात आला असून, नातेवाइकांनी दबाव टाकल्यानेच आपण ॲंटिजन टेस्ट केेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वॉर्डबॉय, परिचारिका, तंत्रज्ञ या सर्वांचे जबाब घेण्यात आले असून मृत्यूनंतर केलेली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असल्याचे त्यांचे मत आहे. परंतु, अर्चना पिंगळे या नर्सने अगोदरच कसलीही वैद्यकीय तपासणी न करता व परवानगी न घेता मृतदेह नेल्याची फिर्याद ठाण्यात दिलेली आहे. त्यामुळे नेमके खरे कोण आणि खोटे कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणातील चौकशी अहवाल आला होता; परंतु, नातेवाइकांचे जबाब नसल्याने तो परत पाठविला आहे. यात सर्व बाजू समजावून घेतल्या जातील. महिलेची नोंद आयसीएमआर पोर्टलला आहे की नाही, याची तपासणी करण्यासही सांगितले आहे.

- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: Shocking; ‘That’ woman decided to be coronated without testing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.