पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून पाटोद्यात गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:54+5:302021-04-30T04:42:54+5:30
पाटोदा : नळपाणी योजनेच्या कामांमधील पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा ...
पाटोदा : नळपाणी योजनेच्या कामांमधील पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
नळ योजनेतील कामाच्या पैशावरून कंत्राटदार विश्वनाथ हुले व माजी आमदार लक्ष्मण जाधव यांचे पुत्र संतोष जाधव यांच्यात अनेक दिवसापासून मतभेद होते. बुधवारी दुपारी संतोष जाधव हे नळ योजनेतील कामाच्या पैशासाठी हुले यांच्याकडे शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या घरी गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतोष जाधव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्री उशीरा हुले यांच्या घरी धाव घेतली. दरम्यान, आपल्याला धोका असल्याचे जाणवल्याने कंत्राटदार विश्वनाथ हुुले यांनी त्यांच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले. या गोळीबारानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी हुले यांच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपाधीक्षक विजय लगारे यांनीदेखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याप्रकरणी २९ एप्रिल रोजी गोपनीय विभागाचे पोलीस नाईक कातखडे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात विश्वनाथ हुले, संतोष जाधव, शरद बामदले, सुधाकर गर्जे, गणेश खाडे, अमृत भोसले, मयूर जाधव, संदीप जाधव व अन्य २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आंधळे, पोलीस हवाललदार तांदळे, पो. हे. भोसले, सानप यांनी केली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
या घटनेनंतर कोणीच गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुमोटोअंतर्गत दोन्ही गटांतील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दोन्ही गटांतील आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी दिली.
...
हे आहे वादाचे कारण
पाटोदा नगरपंचायत होण्यापूर्वी ग्रामपंचायत होती. त्यावेळी ३ कोटी ७० लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. तेव्हा संतोष जाधव हे सरपंच होते. तत्कालीन नियमानुसार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली योजनेचे काम करण्यात आले होते. योजनेचे कंत्राट हे विश्वनाथ हुले यांना मिळाले होते. संतोष जाधव हे सरपंच असल्यामुळे या योजनेचे अध्यक्ष होते. या कामाच्या आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये मतभेद झाले. पाटोदा येथे केलेल्या या योजनेच्या कामाची तक्रार करण्यात आली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे.