दुकानदारांनो, अन्नपदार्थ विकल्यास पावतीवर लिहा परवाना क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:50+5:302021-09-25T04:36:50+5:30
बीड : आता यापुढे अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. याची ...
बीड : आता यापुढे अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार असून, सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत कारवाईची मोहीम राबविण्याची संकल्पना असतानाच आता अन्नपदार्थ विक्री करताना दिलेल्या पावतीवर नोंदणी व परवाना क्रमांक लिहिणे अनिवार्य केले आहे. दि. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे अन्न किती सुरक्षित आहे, खाण्यास योग्य आहे की नाही, आदींची माहिती समजणार आहे. पावती मागणे आणि देणे याबाबतही अन्न प्रशासनाकडे नियम असून, पावती देणे-घेणेही नियमाने बंधनकारक आहे. असे झाले तरच ग्राहकांना तक्रार करता येऊ शकते. जे पावती देत नाहीत, त्यांच्याविरोधातही अन्न प्रशासनाकडे तक्रार देण्याचा नियम आहे.
--
अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या जनजागृती सुरू असून, १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
- इम्रान हाश्मी, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन, बीड