महाबीजच्या उडीद बियाण्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:24+5:302021-06-06T04:25:24+5:30

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्याच्या अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत रोहिणी नक्षत्राचा मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. ...

Shortage of urad seeds of Mahabeej | महाबीजच्या उडीद बियाण्यांचा तुटवडा

महाबीजच्या उडीद बियाण्यांचा तुटवडा

Next

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्याच्या अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत रोहिणी नक्षत्राचा मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. एक ते दीड तास जोरदार पाऊस बरसल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. कृषी दुकानांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या महाबीज, निर्मल उडीद बियाण्याला प्रचंड मागणी आहे. या बियाण्यांचा तालुक्यात तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आष्टी तालुक्यात मागील तीन वर्षांपूर्वी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे कापूस पिकांकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. शेतकरी मागील वर्षीपासून उडीद, तूर, सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. दि.४ जून रोजी दुपारी तालुक्यातील आष्टी, कऱ्हेवडगाव, पोखरी, मातकुळी, चिंचपूर, ब्रह्मगाव, वनवेवाडी, पांढरी, कऱ्हेवाडी या भागांत मेघगर्जनेसह पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांनी आता बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

.....

बाजारात महाबीज व निर्मलच्या उडीद बियाण्यांचा स्टॉक शिल्लक नसल्याने शेतकरी खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करीत आहेत. कंपनीला पैसे भरूनही बियाणे मिळत नाही. नगर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याला कमी बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकरी जामखेड, मिरजगाव, करमाळा येथून बियाणे खरेदी करीत आहेत.

-गणेश बळे, कृषी सेवा केंद्र चालक, आष्टी

....

तालुक्यात महाबीज निर्मल उडीद बियाण्यांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांनी पळापळ करू नये. इतर कंपनीचे बियाणे दुकानांमध्ये उपलब्ध आहे. त्या बियाण्यांची पेरणी करावी. त्या बियाण्यांचेसुद्धा भरपूर उत्पादन निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुकानामध्ये जे उपलब्ध आहे त्या बियाण्यांची पेरणी केली तरी हरकत नाही. शक्यतो शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे खरेदी न करता घरचे बियाणे प्रक्रिया करून वापरावे. निर्मलचे बियाणे दोन दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे.

-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

.....

तालुक्यात कुठेच महाबीज निर्मल कंपनीचे उडीद बियाणे उपलब्ध नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी धावाधाव करावी लागत आहे. महाबीज, निर्मल बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

-संतोष मुटकुळे, शेतकरी

===Photopath===

050621\img-20210604-wa0346_14.jpg

Web Title: Shortage of urad seeds of Mahabeej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.