लसींचा तुटवडा; लाभार्थी ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:37+5:302021-03-20T04:32:37+5:30
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी बीडसह माजलगाव व गेवराईत लसीचा तुटवडा जाणवला. यामुळे लाभार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना ताटकळावे लागले. बीड जिल्हा ...
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी बीडसह माजलगाव व गेवराईत लसीचा तुटवडा जाणवला. यामुळे लाभार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना ताटकळावे लागले. बीड जिल्हा रुग्णालयातून तर काही लाभार्थी लस उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाताने परतल्याचे दिसले. आरोग्य विभागाकडून १६ हजार डोज उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, दुसऱ्या फ्रंटलाइन वर्कर तर तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि काही आजार असलेल्या, तसेच ६० वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे, परंतु गत दोन दिवसांपासून बीड, माजलगाव, तसेच गेवराई उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, ज्या ठिकाणी लस शिल्लक आहे, अशा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस पुरविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले, तसेच जिल्ह्यात लसीचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही. शुक्रवारी सायंकाळी बीड जिल्ह्यासाठी लातूर येथून कोरोना प्रतिबंधक लसीचे १६ हजार १७० डोज उपलब्ध होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.संजय कदम यांनी दिली.
नागरिकांमध्ये लसींबद्दल गैरसमज
कोरोना लसचा दुसरा डोज घेतल्यानंतरही लोक कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे या लसीचा काहीच फायदा होत नाही, असा गैरसमज असल्याने लस घेण्यास आखडता हात घेतला जात आहे, तसेच काहींनी तर पहिला डोस घेतल्यानंतरही दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.
कोट
बीड, गेवराई व माजलगावात थोड्या-फार अडचणी आल्या, परंतु कोणाचेही हाल झाले नाहीत. लातूरहून १६ हजार १७० डाेज मागविले आहेत. जिल्ह्यात आजही लसीचा साठा उपलब्ध आहे. थोड्या-फार त्रुटी आणि अडचणी आहेत, त्या लवकरच दूर होतील.
डॉ.संजय कदम, नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण बीड
----
कोविशिल्ड लस
प्राप्त डोस ५५,४४०
शिल्कल डोस ३,५१०
कोव्हॅक्सिन लस
प्राप्त डोस १९,७७०
शिल्लक डोस ६,७३०
------
आतापर्यंत एवढ्या लोकांना दिली लस
हेल्थ केअर वर्कर्स १४,३८५
फ्रंटलाइन वर्कर्स १४,१९५
ज्येष्ठ नागरिक २४,७८३
४५ वर्षांवरील नागरिक ३,८८६
---
दुसरा डोस
हेल्थ केअर वर्कर्स ६,१५५
फ्रंटलाइन वर्कर्स १,२०५