बीडमध्ये शॉर्टसर्किटने आग; दोन दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 09:17 PM2019-05-28T21:17:03+5:302019-05-28T21:20:08+5:30
अचानक लागलेल्या आगीने 5 ते 6 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे
बीड : शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली. यामध्ये दोन दुकाने जळून खाक झाले. जवळपास ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बीड शहरातील शनिवार पेठ भागात मंगळवारी रात्री ८ वाजता घडली.
पेठबीड भागातील शनिवारपेठ मध्ये महाविर माणिकचंद कोटेचा यांच्या मालकिचे किराणा दुकान आहे. त्यांच्याच बाजुला उपाध्याय नामक व्यक्तीचे व्यंकटेश डिस्ट्रीब्यूटर्स हे दुकान आहे. याच दुकानातून शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले. आग लागण्यापूर्वी दुकानात काही लोक काम करीत होते. आग दिसताच त्यांनी दुकानाबाहेर धाव घेतली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला संपर्क केला. तात्काळ एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तरीही आग आटोक्यात आली नाही. आणखी एक बंब बोलावण्यात आला होता. रात्री नऊ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.