जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:08 PM2024-10-19T15:08:10+5:302024-10-19T15:10:17+5:30
मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे पाठबळ: लक्ष्मण हाके यांचा आरोप
- संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड): मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांनी पाठबळ देत ओबीसींचे फार मोठे नुकसान केल्याचा आरोप ओबीसी आरक्षण नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. तळागाळातील ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षित पदांवर डोळा ठेवत ओबीसी कुठेच नेतृत्व करणार नाही यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या माध्यमातून खेळी रचली आहे. मात्र, ही खेळी यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा देखील हाके यांनी शुक्रवारी दिला. तसेच जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन हाके यांनी केले. ते धारूर तालुक्यातील चाटगाव येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होते.
हाके पुढे म्हणाले, ओबीसींचे नुकसान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी जरांगे यांना आणले आहे. चौथी नापास अडाणी जरांगे यांना संविधानाचा अभ्यास नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा घाट आपण यशस्वी होऊ देणार नाहीत. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाच्या आम्ही समर्थनार्थ आहोत मात्र ओबीसी समाजावर मराठ्यांचे अतिक्रमण कदापी होऊ देणार नाहीत. जरांगे यांच्या मागणीस पाठिंबा दिलेल्या आमदारांना, नेत्यांना ओबीसी समाजाने घरी बसवावे, असे आवाहन हाके यांनी केले.
याप्रसंगी नवनाथ वाघमारे म्हणाले की, मनोज जरांगे यांना संविधानाचा अभ्यास नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगे यांचा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाहीत. योद्धा शरण येत नसेल तर बदनाम केल्या जातो, या युक्तीप्रमाणे प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर खोटे आरोप जरांगेसह काही जणांनी केले. दम असेल तर समोरासमोर वार करून बघा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले.
यावेळी माधव निर्मळ म्हणाले की, ज्या गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी अफाट असे काम केले त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. जातीपातीच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून ओबीसी समाजाचे हे दुर्दैव आहे. भविष्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे सांगतील त्याचप्रमाणे आपण समाजासाठी काम करणार असल्याचे निर्मळ यांनी मनोगतात स्पष्ट केले.
ओबीसी कार्यकर्ते बंडू खांडेकर, सतीश बडे यांनी बीड जिल्ह्यातील ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासमोर वाचला. दीपक सांगळे यांनी सूत्रसंचालन, कृष्णा केकान यांनी प्रस्ताविक केले. संतोष केकान, सरपंच महादेव केकान, उपसरपंच धर्मराज सांगळे, गोविंद केकान यांच्यासह तरुणांची मोठी उपस्थिती मेळाव्यात होती.