सिद्धेश्वर विद्यालय डोनेशन प्रकरण; दोन शिक्षकांना न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:55 AM2022-06-16T11:55:03+5:302022-06-16T11:55:32+5:30
श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आल्या हाेत्या.
माजलगाव(जि.बीड) : येथील सिद्धेश्वर विद्यालयात मंगळवारी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोन शिक्षकांची १५ जून रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, शहर पोलिसांनी मुख्याध्यापकासह खासगी व्यक्तीला अटक केली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आल्या हाेत्या. आमदार सोळंके यांनी मंगळवारी शिक्षण विभाग व पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी एका मंगल कार्यालयात सिद्धेश्वर विद्यालयाचे तीन शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या नावावर पैसे घेत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली. तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक यावेळी तेथून पळून गेला तर सदाशिव ढगे व परमेश्वर आदमाने या शिक्षकांना ताब्यात घेतले होते. त्यांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. गोसावी यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. मुख्याध्यापक बाबूराव आडे व विक्रम पांडे या खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
शिक्षकांचा कामबंदचा इशारा
दोन शिक्षक व मुख्याध्यापक यांना या प्रकरणात गोवण्यात आले असून मुख्य सूत्रधार मोकळा आहे, त्यामुळे त्यास ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून पुढे आली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.