राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:56+5:302021-07-31T04:33:56+5:30

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन ...

Significant increase in sugarcane cultivation in Rajegaon area | राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

Next

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र ऊसलागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त लागवड होत असल्याने नोंदी घेणे बंद केले असले तरी शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत ऊसलागवडीला जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे पुढील वर्षाच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सुरुवातीच्या व परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले, तलाव, विहीर व बोअरच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली, तसेच गोदावरी गंगेवरील असलेला बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा झाला. जायकवाडी धरण भरल्यामुळे उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाणी उपलब्ध होत असल्याने राजेगावसह परिसरातील शेतकरी हे सध्या ऊस लागवडीकडे वळले आहेत.

राजेगावसह सुर्डी नं., रिधोरी, शेलगावथडी, गव्हाणथडी, वारोळा, गव्हाणथडी याठिकाणी आजपर्यंत एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसलागवड झाली असून, लागवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शेतकरी ८६०३२, ८००५, १०००१, ९८०५, ३१०२ जातीच्या उसाला प्राधान्य देत असून, ५० टक्के या जातीच्या उसाची लागवड केली आहे. तुरळक ठिकाणीच २६५ व २६१ या जातीच्या उसाची लागवड झाली आहे.

अतिरिक्त लागवडीमुळे नोंदी बंद

यावर्षी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याने कारखान्यांनी पुढील वर्षाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस उभा राहू नये म्हणून कारखान्यांकडून क्षमतेनुसार ऊसलागवडीला प्राधान्य देत नोंदी घेतल्या आहेत. शेतकरी जास्त लागवड करत असल्याने अतिरिक्त ऊसलागवडीच्या नोंदी सध्या तरी घेणे थांबवले आहे.

वातावरणातील बदलामुळे इतर पिकांच्या तुलनेत उसाचे पीक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. यावर्षी खरिपातील कुठलेच पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांना तारणारे एकमेव पीक म्हणून उसाकडे पाहिले जात आहे.

-मुकुंद कचरे,

शेतकरी

मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, नगदी पीक असल्याने उसाशिवाय अन्य पर्याय नसल्यामुळे शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत.

-बाळू गरड,

शेतकरी

शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही.

-संगेकर, कृषी अधिकारी

Web Title: Significant increase in sugarcane cultivation in Rajegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.