चोऱ्यांच्या विरोधात मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:54 PM2019-12-27T23:54:20+5:302019-12-27T23:55:18+5:30
शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला.
गेवराई : शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला.
यावेळी शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने दोन तास बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. तसेच या मोर्चात महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
काही महिन्यांपासून शहरातील विविध भागात चो-यांचे व दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. याचा तपास येथील पोलिसाला लागत नसल्याने नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच विरोधात आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस ठाण्यावर शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, डॉक्टर, वकिलांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरूवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झाली. हा मोर्चा शास्त्री चौक, बाजार रोड मार्गे बाजार तळावर थांबून तेथे काही महिलांच्या वतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना ठाण्यात निवेदन देण्यात आले.
त्यानंतर बाजार तळावर नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी व महिलांनी सांगितले की, आम्हाला पोलीस ठाणेच नको, चोºयाचा तपास लावा, आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत पण आम्हाला बंदुका द्या, महिलांना दिवसा चालताना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यातील एका ठाण्यातून दुसºया ठाण्यात व एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या पोलिसांना तात्काळ हटवा, अशा शब्दात नागरिकांनी रोष व्यक्त केला.
या मोर्चेक-यांच्या मागण्या आम्ही पोलीस अधीक्षक, महानिरीक्षकांना देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, वकील, डॉक्टरसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी पोलिसांतर्फे बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
मागणी : ठाणे नको, बंदुकीचे परवाने द्या
शहरात एक दिवसाला दहा-दहा चो-या होत आहेत. मात्र याकडे येथील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. एकाही चोरीचा तपास लागत नाही.
त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले असून, येथे पोलीस ठाणेच नको आम्हाला बंदुकीचे परवाने द्या, आम्ही आमचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, असे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.