बीडमधील पाटोद्यात दिव्यांग दिनी जुळल्या रेशीम गाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:35 PM2017-12-04T23:35:52+5:302017-12-04T23:46:27+5:30
१९ वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकरी कन्येचा विवाह तालुक्यातील तळेपिंपळगाव जवळील वाघाचा वाडा येथे थाटामाटात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : १९ वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकरी कन्येचा विवाह तालुक्यातील तळेपिंपळगाव जवळील वाघाचा वाडा येथे थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे हे नवविवाहित दाम्पत्य दिव्यांग आहेत. दिव्यांग दिनाच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडला.
पाटोदा येथील अर्जुन डिडुळ या शेतक-याने १९९८ साली म्हणजे १९ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यास एक मुलगी होती, तर दुसरी गर्भात होती. तिचा जन्म झाला त्यावेळी ती सर्वसामान्य होती; मात्र ती दिव्यांग असल्याचे लक्षात आले. आई यमुना यांनी दोन्ही मुलांना मोठ्या कष्टाने वाढविले. मुक्या असलेल्या मोनिका हिला सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख यांच्या मदतीने कांदलगाव (ता. बार्शी) येथील दिव्यांग शाळेत प्रवेश मिळवला. दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गैरसोय असल्याने शिक्षणात खंड पडला.
उपवर झालेल्या थोरल्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला; मात्र मोनिकास स्थळ कसे शोधावे असा प्रश्न समोर आला. राजाभाऊ देशमुख, बबन बामदळे, हरीभाऊ भोसले यांनी स्थळांचा शोध घेतला असता त्यांना वाघाचा वाडा येथील बाळू जालिंदर दुरूंदे या मुलाची माहिती मिळाली. बाळूही दिव्यांगच आहे. वडील जालिंदर यांनीही आनंदाने होकार दिला; मात्र विवाहसोहळा माझ्या गावात करण्याची अट घातली. गावातील गुरुदत्त संस्थेने विवाहाची जबाबदारी स्वीकारली.
योगायोगाने दिव्यांग दिनाच्या दिवशीच दोन दिव्यांग जीव विवाहाच्या रेशीम गाठीत बांधल्या गेले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यास पंचक्रोशीतील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.