माजलगावात टेंबे गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:58+5:302021-09-22T04:37:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील निजामकालीन परंपरा असलेल्या टेंबे गणपतीचे मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील निजामकालीन परंपरा असलेल्या टेंबे गणपतीचे मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशे, वाजंत्री अशा वाद्यांना फाटा देत फक्त परंपरा असलेले टेंबे पेटवून टेंबे गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
गणपतीला निजामकालीन पार्श्वभूमी असल्याने इतर गणपतीपेक्षा वेगळ्या दिवशी म्हणजे तिथीनुसार भाद्रपद एकादशीच्या दिवशी टेंबे गणपतीची स्थापना करण्यात येते. यावेळी शुक्रवारी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. या दरम्यान हजारो भाविकांनी टेंबे गणपतीचे कोरोना नियम पाळून दर्शन घेतले. त्याचबरोबर नुकतेच देहावसान झालेले तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधी व महादेव पिंडीचा देखावा करण्यात आला. तो लक्ष वेधून घेणारा ठरला होता. टेंबे गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ३५ जणांनी रक्तदान केले. गणपती स्थापनेपासून दररोजची आरती फेसबुक लाइव्ह ठेवण्यात आली होती, त्याचाही भाविकांनी घरी बसून लाभ घेतला. तिथीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून मिरवणूक न काढता परंपरा पाळून केवळ टेंबे पेटवून गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर चारचाकी वाहनांतून गणपतीमूर्ती सिंदफना नदीकाठी नेऊन नदीपात्रात विसर्जन केले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.