शिरूर कासार तालुक्यात सिंदफणेला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:41 PM2019-06-24T23:41:57+5:302019-06-24T23:43:08+5:30

बीड : जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी विविध ठिंकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

Sindhfane flood in Shirur Kasar taluka | शिरूर कासार तालुक्यात सिंदफणेला पूर

शिरूर कासार तालुक्यात सिंदफणेला पूर

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ दिवसांत केवळ ४९० मि.मी. पाऊस : सोमवारी सकाळपर्यंत १४ मंडळांमध्ये ३० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद

बीड : जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी विविध ठिंकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. शिरुरकासार तालुक्यात दोन वर्षानंतर सिंदफणा नदीला पूर आलेला पहावयास मिळाला. १ ते २४ जूनपर्यंत एकूण ४९० मिमी पाऊस नोंदला गेला आहे. उशिरा आगमनामुळे पावसाचा पल्ला गतवर्षीच्या तुलनेत जरी कमी असलातरी लवकरच पेरण्यांना सुरुवात होऊ शकेल अशी चिन्हे आहेत. तर काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
चौदा मंडळात दमदार पाऊस
जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस केज, हरिश्चंद्र पिपरी आणि होळ मंडळात झाला. तर इतर ११ मंडळात ३० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. बीड आणि चौसाळा मंडळात ४० मिमी, पेंडगाव, मांजरसुंबा मंडळात ३७ मिमी पाऊस झाला. पाटोदा मंडळात ३० तर दासखेड मंडळात ४० मिमी पावसाची नोंद झाली. आष्टी मंडळात ३९ तर धामणगावात ४७ मिमी पाऊस झाला. गेवराई मंडळात ४२, शिरुर मंडळात ३९, दिंद्रुड मंडळात ५० मिमी पाऊस नोंदला गेला.
बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६६.३६ मिमी आहे. यावर्षी आतापर्यंत ४४.६ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीतील प्रमाण १२५. २ मिमी इतके होते. झालेला पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
गंगामसला : तब्बल सतरा दिवसांच्या खंडानंतर मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे माजलगाव तालुक्यात काही गावांमध्ये पेरणीला वेग आला आहे.
काही महसूल मंडळांमध्ये मोठा तर काही महसूल मंडळांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक शेतकºयांनी धूळपेरणी केली होती. त्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
बागायती व जिरायती क्षेत्र असलेल्या शेतकºयांनी कपाशी लागवडीला पसंती दिल्याचे पहावयास मिळत आहे.

आष्टी तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस
कडा : अनेक महिन्यांपासून नदी-नाले, बंधारे यांना पाण्याची प्रतीक्षा होती; पण पाऊस काही केल्या पडत नसल्याने जनता हवालदिल झाली होती. या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत झालेल्या पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाटण सांगवीसह परिसरातील बंधारे तुडूंब भरले. आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आष्टी तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याविना जनतेची मोठी तारांबळ उडाली असल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होता.
जून महिना कोरडाच चालला असल्याने तो अधिकच हवालदिल झाला होता. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेरी, खाकाळवाडी, वटणवाडी, दादेगाव कासारी, पिंपरी आष्टी, मांडवा, केरूळ, मोरेवाडी, डोईठाण, निमगाव चोभा, हातोला, पाटसरा, पाटण सांगवी, शिराळ, डोंगरगण, घाटापिंपरी, गौखेल, वेलतुरी, सावरगांव, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी, दौलावडगांव, अंभोरा, धानोरा, लोणी, पिपळा, पुडी वाहिरा, शिरापुर, मेहकरी यासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
अनेक महिन्यांपासून पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेले ठिकठिकाणचे बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी खुश झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर याच पावसावर आता परिसरात शेतकरी चाड्यावर मूठ धरण्याची त्याची तयारी दिसून येत आहे.

Web Title: Sindhfane flood in Shirur Kasar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.