सिंघम अवतरणार : दहाव्या मिनिटाला मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:05+5:302021-05-27T04:35:05+5:30
बीड : अडचणीच्या काळात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाकडून लवकरच आपत्कालीन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ...
बीड : अडचणीच्या काळात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाकडून लवकरच आपत्कालीन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ११२ नंबर डायल केल्यास अवघ्या दहा मिनिटात पोलीस हजर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील जवळपास ३८४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हा पोलीस दलामध्ये या उपक्रमांतर्गत ३९ चारचाकी व ४० अद्ययावत दुचाकींचा समावेश होणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात कोरोना काळात अनेक ठिकाणी चोऱ्या, दरोडे व लूटमारीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या यंत्रणेचा फायदा जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी होणार आहे. जिल्हा अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये दोन प्रशिक्षित अधिकाऱ्यांसमवेत नवीन यंत्रणेतील ४३ मोबाईल सेटअप बसवण्याचे काम सुरु आहे. प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा १ जूनपासून सुरु करण्यात येणार असून, १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र राबवली जाण्याची शक्यता आहे. काही आपत्कालीन प्रसंग आल्यास ११२ नंबर डायल केल्यास अडचणीत असलेल्या व्यक्तीचे लोकेशन व इतर माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे १० मिनिटात त्या व्यक्तीच्या जवळ पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी पोहोचणार आहेत. या यंत्रणेमुळे अनेक प्रसंग टाळण्यास मदत होणार आहे. लवकरात लवकर नागरिकांना मदत मिळणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप देखील बसणार आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाणे २८
पोलीस अधिकारी १८०
पोलीस कर्मचारी २१६८
कॉल येताच मिळणार लोकेशन...
अडचणीत सापडलेल्या नागरिक, पीडितांनी त्यांच्या मोबाईलवरून ११२ नंबर डायल केल्यास त्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळणार आहे. तो व्यक्ती कोणत्या जिल्ह्यातील व गावातील आहे. याची देखील माहिती पोलीस कंट्रोल मुख्यालयात मिळेल व त्यानंतर जवळ पेट्रोलिंगवर असलेली गाडी त्याठिकाणी मदतीसाठी जाईल अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे.
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एखादा व्यक्ती अडचणीत आल्यास त्याने ११२ क्रमांक डायल करावा, त्यानंतर अवघ्या १० मिनिटात संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचतील.
प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रशिक्षित पोलीस कर्मचारी, अधिकारी असणार आहेत. त्यामुळे वेळीच मदत मिळून अनेक दुर्घटना टाळण्यास मदत होईल.
३८४ जणांना मिळणार प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात ४० पोलीस कर्मचाऱ्यांना या यंत्रणेविषयी प्रशिक्षण मिळणार आहे. तर, पुढील टप्प्यात ३८४ कर्मचारी व १८० अधिकाऱ्यांना या नवीन ११२ क्रमांका संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अडचणीच्या काळात ११२ क्रमांक डायल केल्यानंतर नागरिकांना वेळीच मदत मिळावी, यासाठी ही हायटेक यंत्रणा महत्त्वाचे काम करणार आहे. ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक बीड