झाडाचे गुण गात, गुण घेत पर्यावरणाचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:37 PM2020-02-13T23:37:35+5:302020-02-13T23:38:13+5:30
प्रभात बुडूख । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मी वड बोलतोय...असे वाक्य उच्चारताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ््यांचा गजर केला. मात्र, ...
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मी वड बोलतोय...असे वाक्य उच्चारताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ््यांचा गजर केला. मात्र, संमेलन अध्यक्ष असलेल्या वडाने सयाजी शिंदे यांच्या मुखातून आपली जन्माची व आयुष्याची व्यथा मांडण्यास सुरुवात करताच उपस्थित सर्व भावुक झाले. विनाश टाळायचा असेल तर वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्याची आतुरता संमेलनस्थळावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. पालवण येथील सह्याद्री देवराई परिसरात जगातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाच्या निमित्ताने बीडसह राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींनी उत्सव साजरा केला.
झाडे जगली तर मराठवाड्याचा वाळवंट होण्यापासून आपण रोखू शकतो. त्यामुळे झाडे लावा-झाडे जगवा, ‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’ या श्लोगनचा जयघोष करीत १३ फेब्रुवारी रोजी जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले.
संमेलनासाठी आलेल्या सर्वांनी स्टॉलवर विविध विषयांची माहिती घेतली. यामध्ये वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनक्षेत्राची व झाडांची माहिती देणारे स्टॉल उभारले होते. प्रगतशिल शेतकऱ्यांनी विकसित केलेली रोपं, फळझाडांची माहिती देणारे स्टॉल येथे होते. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. विविध माहिती ते जाणून घेत होते. शेकडो विद्यार्थी, तरूणांची लक्षणीय उपस्थिती पाहून या वृक्ष संमेलनात भावी पिढीला वृक्ष संवर्धनाचे धडे मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या.
वृक्ष संमेलनासाठी अनेकांचे दातृत्व
जगातील पहिले वृक्ष संमेलन बीडमध्ये होत असल्याने शहरातील उद्योजक, व्यापारी महासंघ, औषध विक्रेता संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमींनी भोजन, निवास, परिसर नियोजन, पिण्याचे पाणी आदी विविध जबाबदाऱ्यांचे दायित्व स्वीकारत आयोजनाचा गोवर्धन उचलला.
कापडी पिशवी व रोपांचे केले वाटप
वृक्ष संमेलनस्थळावर आलेल्या प्रत्येकांना प्लास्टिक न वापरण्याचा संदेश याठिकाणी देण्यात आला होता. तसेच वृक्ष संमेलनात प्रत्येकाला पार्यावरणपूरक कापडी पिशवी व विविध रोपांचे वाटप करण्यात आले.
गरूडाला निसर्गात सोडून होणार संमेलनाचा समारोप
शुक्रवारी वृक्ष संमेलनाचा समारोप होईल. मान्यवरांचे मार्गदर्शन, वृक्ष सुंदरी व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. जखमी गरुडाची सुश्रूषा पूर्ण झाल्याने त्याला निसर्गात सोडून संमेलनाची सांगता होणार आहे.